कागल : आमच्या विरोधी उमेदवाराला पराभव दिसू लागल्याने ते आता पराभवाची कारणे शोधत आहेत. या गोष्टीचा मी निषेध करतो. सर्वसामान्य जनतेने निवडणूक हाती घेतल्याने माझा एक लाखाच्या फरकाने विजय होईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार हसन मुश्रीफ यांनी केले. मतदान झाल्यानंतर येथील बॅरिस्टर खर्डेकर चौकात जमलेल्या कार्यकर्त्यांच्या समोर ते बोलत होते. यावेळी मोठा जल्लोष करण्यात आला.मंत्री मुश्रीफ यांनी तरुण कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर छत्रपती उदयनराजे यांच्या स्टाइलप्रमाणे तीन वेळा कॉलरही उडवली, तसेच शड्डूही ठोकला. यावेळी फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात आली. स्वत: मुश्रीफ यांनी विविध घोषणाही दिल्या. येथील पालकर कॉम्प्लेक्समध्ये गेली अनेक वर्षे या पक्षाचे निवडणूक कार्यालय असते. मतदान झाल्यानंतर हे कार्यकर्ते या कार्यालयासमोर मोठ्या संख्येने जमतात. आजही मतदान झाल्यानंतर शहरातील विविध प्रभागांतील कार्यकर्ते घोषणा देत या चौकात आले. तेथे मंत्री मुश्रीफ यांनी मार्गदर्शन केले. मुश्रीफ म्हणाले, आमचे कार्यकर्ते खूप राबले आहेत. आता विजयाचा जल्लोष करण्यासाठी दोन दिवस शांतपणे विश्रांती घ्यावी, तसेच सर्वांनी शांतता राखावी. यावेळी भैया माने म्हणाली की, दीपावली व कागलचा उरूसही बाजूला ठेवून कार्यकर्ते निवडणुकीसाठी राबले आहेत. या मतदारसंघातील जनतेने मुश्रीफांच्या कार्याला आपले मत दिले आहे. यावेळी कागल शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
Kagal Vidhan Sabha Election 2024: मतदानानंतर कागलमध्ये मंत्री मुश्रीफ समर्थकांकडून जल्लोष video
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 1:27 PM