'बटेंगे तो कटेंगे' ला काँग्रेसचे 'पढेंगे तो बढेंगे' ने उत्तर - सुप्रिया श्रीनेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 01:19 PM2024-11-14T13:19:31+5:302024-11-14T13:21:38+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली नाही
कोल्हापूर : महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांची भूमी आहे. हे राज्य जोडणारे आहे. त्यामुळे भाजपचा 'बटेंगे तो कटेंगे' हा नारा महाराष्ट्रात चालणार नाही. त्यांच्या या नाऱ्याला आम्ही 'पढेंगे तो बढेंगे' ने उत्तर देऊ, या शब्दांत काँग्रेस सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफाॅर्मच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुप्रिया श्रीनेत यांनी बुधवारी भाजपचा समाचार घेतला.
संविधानाच्या रक्षणासाठी महाराष्ट्रच पहिल्यांदा धावून आला असून पुढेही महाराष्ट्रच त्याचे रक्षण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र हा काँग्रेसचा डीएनए असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
फडणवीस यांनी माफी मागितली नाही
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कोल्हापुरात आलेल्या श्रीनेत यांनी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्यासमवेत पत्रकारांशी संवाद साधला. श्रीनेत म्हणाल्या, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजप हिंदू-मुस्लीम, भारत-पाकिस्तान यासारखे विषय मुद्दामहून आणत आहे. महाराष्ट्राशी काहीही देणेघेणे नसलेले प्रश्न उपस्थित करत आहे. मात्र, येथील जनता सजग आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर पंतप्रधानांनी ढोंगीपणा आणत माफी मागितली. देवेंद्र फडणवीस यांनी तर तीही मागितली नाही.
उद्योगांना कर्जमाफी पण शेतकऱ्यांची नाही
भाजपचा 'बटेंगे तो कटेंगे' हा नारा महाराष्ट्रात चालणार नाही. आम्ही 'पढेंगे तो बढेंगे' हा नारा घेऊन पुढे जात आहोत. सोयाबीन, कांदा यांचे भाव कोसळले आहेत. महाराष्ट्रात रोज ७ शेतकरी आत्महत्या करत आहेत. १६ लाख कोटींची उद्योगांना कर्जमाफी दिली, पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही. हे सरकार कुणासाठी चालवले जात आहे, असा सवाल श्रीनेत यांनी उपस्थित केला.
शहांना चर्चेचे खुले आव्हान
इडी, सीबीआयला घाबरून काहीजण पक्षातून पळून गेले. मात्र, अशा वातावरणातही सतेज पाटील यांच्यासारखे शेर पक्षात राहून काम करत आहेत, असे सांगत श्रीनेत म्हणाल्या, अमित शहा यांनी नोकरी, रोजगार, महागाई, कारभार, महाराष्ट्र, अस्मिता, कोल्हापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर पाच मिनिट सतेज पाटील यांच्याशी चर्चा करावी. त्यांचा गळा सुकेल पण ते चर्चा करू शकणार नाहीत, कारण ते मुद्द्यांवर चर्चा करू शकत नाहीत.