भारत चव्हाणकोल्हापूर : पक्षाची उमेदवारी उशिरा जाहीर करणे, जाहीर केलेल्या उमेदवाराला विरोध होणे, परस्पर उमेदवार बदलणे, त्यानंतर उद्भवलेली बंडखोरी रोखण्यात झालेला विलंब, कोणताही निर्णय घेत असताना एकमेकांना विश्वासात न घेणे, परस्पर विरोधी मोहिमा चालविणे, या सगळ्या गोष्टींचा परिणाम ‘कोल्हापूर उत्तर’मध्येकाँग्रेसला भोगावा लागला आणि पक्षाच्या चिन्हाऐवजी एका अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत करण्याची वेळ काँग्रेसवर आली. याला प्रमुख कारण ठरले आहे, ते माजी नगरसेवकांचे हेवेदावे!मधुरिमाराजे, मालोजीराजे यांच्यापैकी कोणीही निवडणूक लढविणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे आमदार सतेज पाटील यांनी ‘कार्यकर्ता पॅटर्न’ म्हणून राजेश लाटकर यांच्या नावाची शिफारस जिल्हाध्यक्ष नात्याने केली. लाटकर यांच्या नावाला महापालिकेतील राजकारणामुळे तीव्र विरोध झाला. २७ माजी नगरसेवकांनी लाटकर यांना विरोध केला. विरोध करणाऱ्यांपैकी सचिन चव्हाण व शारंगधर देशमुख इच्छुक होते. आपणाला उमेदवारी मिळाली नाही तरी चालेल; पण लाटकर यांना उमेदवारी देऊ नये, अशी भूमिका त्यांनी घेतली. विरोध करणाऱ्यांमधील ऐंशी टक्के ‘दक्षिण’मधील होते. तर उरलेल्यांपैकी काही जण काँग्रेसपासून दुरावत चालले होते.
दुसरीकडे ज्यांची इच्छा नव्हती त्या मालोजीराजे व मधुरिमाराजे यांच्यावर कधी दबाव टाकून तर कधी भावनिक मुद्द्याला हात घालण्याचा माजी नगरसेवक प्रयत्न करत होते. तुम्ही नसाल तर आम्ही कोणाचा प्रचार करायचा, अशी साद घातली जाऊ लागली. जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्यावर लाटकरना विरोध करणाऱ्या माजी नगरसेवकांचा तर तिकडे न्यू पॅलेसवर भावनिक साद घालणाऱ्या नगरसेवकांचा प्रभाव वाढत गेला. वास्तविक, येथे सतेज पाटील आणि मालोजीराजे यांनी आधी घेतलेल्या भूमिकेवर ठाम राहायला पाहिजे होते; पण दोघेही माजी नगरसेवकांच्या आग्रहाला बळी पडले. सतेज पाटील यांनी उमेदवारी बदलली आणि मधुरिमाराजे निवडणूक लढण्यास राजी झाल्या. इथेच मोठी गल्लत झाली.दुपारी दोन वाजता शाहू छत्रपती यांनी एका चांगल्या कार्यकर्त्याचा तसेच एका चांगले भविष्य असलेल्या सुनेचा राजकारणात का बळी द्यायचा, हा प्रश्न सतावू लागला. त्यातून त्यांनी सुनेला माघार घेऊन कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय ऐनवेळी झाल्याने काँग्रेस पक्ष व आमदार सतेज पाटील तोंडघशी पडले. राज्यातील राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सतेज पाटील यांच्या होमपिचवर हे घडले, याचे शल्य त्यांच्या मनात नक्कीच राहील. या सगळ्या गडबडीत काँग्रेस पक्षात परिणामांची चर्चा फारशी गांभीर्याने झाल्याचे दिसले नाही.शिस्त, संकेत पायदळीयापूर्वी काँग्रेस पक्षात कोल्हापूरमधून माजी महापौर प्रल्हाद चव्हाण यांना मिळालेली उमेदवारी बदलण्यात आली होती, त्यावेळी पक्षाचा आदेश मानून चव्हाण यांनी समजूतदारपणा दाखविला. आजच्या इतका अपरिपक्वपणा तेव्हा घडला नाही. खुद्द चव्हाण यांनी उमेदवारी बदलल्यानंतर बंडखोरी न करता पक्षाचे अधिकृत उमेदवार महादेवराव आडगुळे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. तेव्हाची काँग्रेसमधील शिस्त, संकेत यावेळी पाहायला मिळाली नाही.राजेश लाटकरांच्या माघारीबाबत आग्रहलाटकर काँग्रेससोबत पाहिजेत, ते असतील तरच पुढे जाऊ, हा खासदार शाहू छत्रपती यांचा आग्रह होता. त्यावेळी माजी नगरसेवकांसह उद्धवसेनेचे शहरप्रमुख सुनील मोदी यांनी ती जबाबदारी स्वीकारली होती. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माघार घेण्याच्या आदल्या दिवसापर्यंत बरेच पाणी पुलाखालून गेले होते. जेव्हा चाचपणी झाली तेव्हा अनेक ठिकाणी काँग्रेसला जोडण्या कराव्या लागणार असल्याचे निदर्शनास आले. अशा परिस्थितीत लाटकर बंडखोरी करणार असतील तर महागात पडणार म्हणून छत्रपती घराण्यात अस्वस्थता पसरली. लाटकर माघार घ्यायला येणार आहेत, असेच शेवटपर्यंत त्यांना सांगितले जात होते.