काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजेश लाटकर नॉट रिचेबल, चर्चेला उधाण; अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 01:27 PM2024-11-04T13:27:53+5:302024-11-04T13:30:17+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे काँग्रेसचे टेन्शन वाढतच आहे. अर्ज माघारीचा आज, सोमवारी शेवटचा दिवस ...
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे काँग्रेसचे टेन्शन वाढतच आहे. अर्ज माघारीचा आज, सोमवारी शेवटचा दिवस असतानाच बंडखोर उमेदवार राजेश लाटकर नॉट रिचेबल झाल्याने खळबळ उडाली आहे.
काँग्रेस नेते सतेज पाटील हे लाटकर यांची मनधरणी करण्यासाठी घरी गेले असता ते सकाळपासूनच संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचे समजले. यानंतर त्यांची शोधा शोध सुरू झाली आहे. काल रात्री लाटकर यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपली भूमिका जाहीर केली होती. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असल्याने आज ते आपला निर्णय जाहीर करणार होते. मात्र, सकाळपासूनच ते गायब झाल्याने चर्चेंना उधाण आले आहे.
लाटकर निवडणूक लढवणार?
लाटकर यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी विरोध केला. यानंतर अवघ्या काही तासांत त्यांची उमेदवारी रद्द करून काँग्रेसकडून मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली. यानंतर लाटकर समर्थकांमध्ये नाराजी पसरली होती. नेते मंडळींनी लाटकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही राजेश लाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज उमेदवारी माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. सकाळपासूनच ते नॉट रिचेबल असल्याने माघार घेणार की निवडणूक रिंगणात उतरणार हे काही तासात स्पष्ट होणार आहे.
षड्यंत्र रचून उमेदवारी रद्द केली
काल, रविवारी छत्रपती कुटुंबियांकडून राजेश लाटकर यांची भेट घेऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यावेळी राजेश लाटकर यांनी षड्यंत्र रचून आपली उमेदवारी रद्द करण्यात आल्याचा थेट आरोप खासदार शाहू छत्रपती यांच्यासमोर केला होता.
जनतेचा रेट्यामुळे मधुरिमाराजे निवडणुकीच्या रिंगणात
मधुरिमाराजेंच्या उमेदवारीबाबत बोलताना खासदार शाहू छत्रपती म्हणाले, एका घराण्यातील व्यक्ती राजकारणात असेल तर पुष्कळ झाले, त्या दृष्टीने आमची हालचाल, वाटचाल सुरू होती. पण जनतेचा रेट्यामुळे मधुरिमाराजे छत्रपती यांना निवडणुकीत उतरावे लागले असल्याचे सांगितले.