कोल्हापूर उत्तर'मध्ये ‘काँग्रेस’ची अस्तित्वासाठी धडपड, शिवसेनेसमोर आरोप खोडून काढण्याचे आव्हान
By भारत चव्हाण | Published: November 15, 2024 04:58 PM2024-11-15T16:58:14+5:302024-11-15T16:58:56+5:30
भारत चव्हाण कोल्हापूर : सत्तारुढ पक्षातील ताकदवान उमेदवार विरुद्ध सर्वसामान्य कार्यकर्ता अशी लढत ‘ कोल्हापूर उत्तर’मतदार संघात होत आहे. ...
भारत चव्हाण
कोल्हापूर : सत्तारुढ पक्षातील ताकदवान उमेदवार विरुद्ध सर्वसामान्य कार्यकर्ता अशी लढत ‘कोल्हापूर उत्तर’मतदार संघात होत आहे. शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांनी निवडणूक लढवायचीच असा निर्धार करून मतदार संघातील प्रत्येक प्रभागात नियोजनबद्ध तयारी केली, विकास कामे केली. काँग्रेसमधून मात्र उमेदवारी कोणाला द्यायची हा घोळ माघारीच्या दिवसापर्यंत सुरू राहिला. शेवटी राजेश लाटकर सारख्या अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत करण्याची वेळ आली. या पार्श्वभूमीवर येथील मतदार संपर्कात असलेल्या कार्यकर्त्याला मदत करतात की सर्वसामान्य कार्यकर्त्याला हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राजेश क्षीरसागर यांची गत निवडणुकीत हॅटट्रिक चुकली. पराभव झाला म्हणून ते थांबले नाहीत. सामाजिक कार्यात, लोकांच्या संपर्कात राहिले. एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून पराभव झाल्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी क्षीरसागर यांना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षपद दिले. त्यामुळे त्यांच्यातील कार्यकर्त्याला बळ मिळाले. शहरासाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतु शिवसेनेत फूट पडली आणि राज्यातील सत्ता बदलली. त्यावेळी ते ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. सत्तेसोबत राहिल्याने त्यांचा नक्की फायदा झाला. कोल्हापूर शहरासाठी त्यांनी जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न केला.
काँग्रेस पक्षातून आधी उमेदवारी जाहीर झालेल्या राजेश लाटकर यांना विरोध झाला. त्यामुळे पक्षाला त्यांची उमेदवारी बदलावी लागली. पक्षाची गरज म्हणून मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली. या गोंधळामुळे काँग्रेस पक्षात संशयकल्लोळ निर्माण झाला. पक्ष नेतृत्वावर त्याचा कमांड राहिला नाही. जो घोळ व्हायचा तो उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी कोल्हापूरकरांनी पाहिला. काँग्रेसचा उमेदवार ठरविताना पक्षाला बरेच धक्के बसले. क्षीरसागर यांचा प्रचार सुरू झाला असताना काँग्रेस पक्षात मात्र रुसवे -फुगवे काढण्यात, ताणतणाव शांत करण्यात, सहकारी पक्षांच्या नेत्यांची समजूत काढण्यात सगळा वेळ गेला. अजूनही काही आलबेल असल्याचे दिसत नाही.
प्रचारात क्षीरसागर यांच्यावर काही गंभीर आरोप होत आहेत. परंतु क्षीरसागर यांना हा काही नवीन अनुभव नाही. त्यांनी संयम सोडलेला नाही. ‘माझं काम बोलतंय’ हा त्यांचा दावा आहे. टीकेला उत्तर देण्यापेक्षा केलेल्या विकास कामांची माहिती मतदारांना देण्यास सुरुवात केली आहे. प्रचाराचा त्यांचा हाच मुद्दा प्रभावी ठरत आहे. लाटकर यांच्यासमोर तर आत्ता काही सांगण्यासारखं नसलं तरी निवडून आल्यावर काय करणार हे सांगताना दिसत आहेत. रस्त्यावरील सर्वसामान्य, गरीब कुटुंबातील तत्वनिष्ठ उमेदवार अशी छबी निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे.
हा असा आहे फरक
- क्षीरसागर यांचा मतदार संघात जनसंपर्क आहे. लाटकर यांच्यावर बऱ्याच मर्यादा आहेत.
- क्षीरसागर यांच्याकडे विकास कामांचे आकडे आहेत तर लाटकर यांच्याकडे व्हीजन आहे. मंडळांना मदत केल्याने क्षीरसागर यांचा थेट संपर्क आहे.
- लाटकर यांना मंडळापर्यंत पोहोचण्याचे आव्हान आहे.
- क्षीरसागर यांच्याकडे राजकारणातील सर्व गुण आहेत, लाटकर यांच्याकडे सर्वसामान्य कार्यकर्ता ही बिरुदावली आहे.
कोल्हापूर उत्तर मतदार संघ
- एकूण मतदान - ३ लाख ०१ हजार ७४३
- पुरुष मतदार - १ लाख ४८ हजार ८०९
- महिला मतदार - १ लाख ५२ हजार ९१६
- महापालिकेचे एकूण प्रभाग - ५४, संपूर्ण शहरी भाग.
२०१९ मध्ये काय घडलं?
- स्व. चंद्रकांत जाधव - काँग्रेस (विजयी) - ९१ हजार ०५३
- राजेश क्षीरसागर - शिवसेना - ७५ हजार ८५४
- स्व. चंद्रकांत जाधव यांना १५ हजार १९९ चे मताधिक्य.
- २०२२ ला पोटनिवडणुकीत जयश्री जाधव ९७३३२ मते घेऊन विजयी
- शाहू छत्रपती यांना लोकसभेला मिळालेले मताधिक्य -१३ हजार ८०८