कोल्हापूर जिल्ह्यात जागा वाटपात काँग्रेसची मुसंडी, पण चर्चा शरद पवार यांच्या मुत्सद्देगिरीची
By राजाराम लोंढे | Published: October 28, 2024 01:23 PM2024-10-28T13:23:20+5:302024-10-28T13:28:43+5:30
महायुतीत शिंदेसेनाच भारी पण मित्रांना समान वाटणी
राजाराम लोंढे
कोल्हापूर : विधानसभेसाठी महाविकास आघाडी व महायुतीचे कोल्हापूर जिल्ह्यातील जागा वाटपाचे घोडे अखेर पंचगंगेत बुडाले. आघाडीमध्ये दहापैकी पाच जागा घेत काँग्रेस पक्षाने मुसंडी मारली असली तरी बिनीचे शिलेदार साेडून गेले तरी ज्येेष्ठ नेते शरद पवार यांनी राजकीय मुत्सद्दीगिरीच्या बळावर तब्बल तीन जागा पदरात पाडून घेतल्या. महायुतीमध्ये शिंदेसेना भारी ठरली असली तरी तीन मित्रांना समान वाटणी दिली.
जागा वाटपावरून आघाडी व महायुती घमासान सुरू होते. ‘कोल्हापूर उत्तर’, ‘हातकणंगले’, ‘राधानगरी’, ’चंदगड’, ‘शिरोळ’ येथील उमेदवारीवरून आघाडी व महायुतीमध्ये शेवटपर्यंत संघर्ष सुरू राहिला. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत आली तरी ‘कोल्हापूर उत्तर’ मध्ये उमेदवारीचा घोळ सुरू होता. आघाडीमध्ये ‘राधानगरी’, ‘चंदगड’ व ‘काेल्हापूर उत्तर’ वरून ताणाताणी सुरू होती. जागा वाटपात दहापैकी पाच जागा घेत आमदार सतेज पाटील यांनी मुसंडी मारली असली तरी अखंड पक्ष फुटून गेल्यानंतरही तीन जागा पदरात पाडून घेऊन राजकीय मुत्सद्दीगिरी दाखवली आहे. उध्दवसेनेला दोनच जागांवर समाधान मानावे लागले आहे.
महायुतीमध्ये ‘कोल्हापूर उत्तर’, ‘हातकणंगले’, ‘चंदगड’, ‘इचलकरंजी’मध्ये जागा वाटपावरून शिंदेसेना व भाजपमध्ये संघर्ष पहावयास मिळाला. मात्र, दहापैकी तीन जागा घेत शिंदेसेना भारी ठरली. जनसुराज्य, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी दोन जागा तर शिरोळमध्ये राजर्षी शाहू आघाडीला एक जागा देऊन मित्रपक्षांना खुश करण्याचा प्रयत्न केला.
उध्दवसेनेचे पश्चिम महाराष्ट्राकडे दुर्लक्ष
जागा वाटपात राज्यातही काँग्रेसच भारी ठरत असून उध्दवसेनेच्या नेत्यांनी पश्चिम महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. त्यातही कोल्हापुरात २०१४ ला पक्षाचे सहा आमदार होते, २०१९ ला एक आमदार निवडून आला असला तरी बार्गिंनिगमध्ये नेते कमी पडले. महापालिका कार्यक्षेत्रातील एक जागा पक्षाला घेऊन आगामी निवडणुकीत पक्षाची मुळे अधिक घट्ट करण्याची संधी उध्दव ठाकरे यांनी घालवल्याची भावना कार्यकर्त्यांत आहे.
पाच ठिकाणी काटाजोड तिरंगी लढत
उमेदवारी अर्ज माघारीची मुदत ४ नोव्हेंबर पर्यंत आहे. सध्याचे चित्र पाहिले तर ‘करवीर’, ‘राधानगरी’, ‘चंदगड’, ‘हातकणंगले’, ‘शिरोळ’ मध्ये तिरंगी लढत तर उर्वरित ठिकाणी सरळ तुल्यबळ सामना होणार आहे.
जिल्ह्यात अशा होणार लढती
मतदारसंघ - महाविकास आघाडी - महायुती
- कोल्हापूर उत्तर - राजेश लाटकर (काँग्रेस) - राजेश क्षीरसागर (शिंदेसेना)
- कोल्हापूर दक्षिण - ऋतुराज पाटील (काँग्रेस) - अमल महाडिक (भाजप)
- करवीर - राहुल पाटील (काँग्रेस) - चंद्रदीप नरके (शिंदेसेना)
- राधानगरी - के. पी. पाटील (उध्दवसेना) - प्रकाश आबीटकर (शिंदेसेना)
- शाहूवाडी - सत्यजीत पाटील-सरुडकर (उध्दवसेना) - विनय कोरे (जनसुराज्य)
- चंदगड - नंदिनी बाभूळकर (राष्ट्रवादी शरद पवार गट) - राजेश पाटील (राष्ट्रवादी)
- कागल - समरजीत घाटगे (राष्ट्रवादी शरद पवार गट) - हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी)
- हातकणंगले - राजू आवळे (काँग्रेस) - अशोकराव माने (जनसुराज्य)
- इचलकरंजी - मदन कारंडे (राष्ट्रवादी शरद पवार गट) - राहुल आवाडे (भाजप)
- शिरोळ - गणपतराव पाटील (काँग्रेस) - राजेंद्र पाटील-यड्रावकर (शाहू आघाडी)