Vidhan Sabha Election 2024: करवीर मतदारसंघात सहानुभूती की संपर्क; तारणार कोण ?

By राजाराम लोंढे | Published: November 14, 2024 04:44 PM2024-11-14T16:44:06+5:302024-11-14T16:45:05+5:30

अस्तित्वासाठी निकराची झुंज : ‘जनसुराज्य’ची बंडखोरी कुणासाठी फायद्याची

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Congress's Rahul Patil and Shindesena's Chandradeep Narake are fighting In Karveer Constituency | Vidhan Sabha Election 2024: करवीर मतदारसंघात सहानुभूती की संपर्क; तारणार कोण ?

Vidhan Sabha Election 2024: करवीर मतदारसंघात सहानुभूती की संपर्क; तारणार कोण ?

राजाराम लोंढे

कोल्हापूर : ‘करवीर’मध्येकाँग्रेसचे राहुल पाटील व शिंदेसेनेचे चंद्रदीप नरके यांच्यात निकराची झुंज पाहावयास मिळत असून ‘राहुल’ यांना सहानुभूती तर ‘चंद्रदीप’ यांना ‘संपर्क’ तारणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ‘जनसुराज्य’चे संताजी घोरपडे यांची बंडखोरी महायुतीपेक्षा आघाडीला मारक ठरण्याची शक्यता असल्याने काँग्रेसने सावध जोडण्या लावल्या आहेत. नरके यांनी काँग्रेसला खिंडार पाडत ‘हवा’ करण्याचा प्रयत्न केला.

लोकसभेला काँग्रेसचे खासदार शाहू छत्रपती यांना येथून ७१ हजारांचे मताधिक्य मिळाल्याने विधानसभा सोपी नसल्याचा इशारा दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांनी चंद्रदीप नरके यांना दिला होता. दरम्यानच्या काळात पाटील यांचे निधन झाले, त्यांचे वारसदार राहुल पाटील रिंगणात उतरले आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले, वडिलांची सहानुभूती घेऊन ते मतदारांसमोर जात आहेत. त्यांच्या दिमतीला ‘गोकुळ’चे संचालक डॉ. चेतन नरके, माजी आमदार संपतराव पवार, उद्धवसेनेचे पदाधिकारी ताकदीने उतरले आहेत; पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अद्याप शांत आहे. 

चंद्रदीप नरके हे पराभूत झाल्यापासून मतदारसंघात संपर्कात आहेत, मागील निवडणुकीत घातक ठरलेले मुद्दे त्यांनी निवडणुकीअगोदरच निकालात काढले. लोकसभेतील मताधिक्यावर नरके यांनी रणनीती ठरवून कामाला लागले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, भाजपचे हंबीरराव पाटील यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. मित्रपक्षांची साथ आणि काँग्रेसला भगदाड पाडत ‘हवा’ करण्यात ते सध्या तरी यशस्वी दिसत आहेत.

‘जनसुराज्य’ची बंडखोरी कुणासाठी फायद्याची

जनसुराज्य पक्ष महायुतीत असतानाही येथे संताजी घोरपडे यांना रिंगणात उतरून चंद्रदीप नरके यांची कोंडी केली असे जरी वाटत असले तरी, त्याचा फटका काँग्रेसला बसू शकतो. म्हणूनच, घोरपडे यांच्या बंडानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शांत बसल्याची चर्चा आहे.

उद्धवसेनाच आक्रमक

चंद्रदीप नरके हे राहुल पाटील यांच्यावर हल्ले चढवत असताना, काँग्रेसकडून तोडीस तोड उत्तर अजूनतरी दिले जात नाही. उद्धवसेनेचे संजय पवार यांच्यासह पदाधिकारी नरके यांना अंगावर घेत आहेत.

सतेज पाटील जोडण्या सुरु

करवीर’मध्ये आमदार सतेज पाटील यांना मानणारा मोठा गट आहे. ते ‘राहुल’ यांच्या सोबत असले तरी त्यांचे सगळे लक्ष ‘कोल्हापूर उत्तर’व ‘दक्षिण’मध्येच दिसते. त्यांनीही आता ‘करवीर’मध्ये जोडण्या लावल्याने चुरस निर्माण झाली आहे.

‘जुना करवीर’ ठरवणार आमदार

‘परिते’, ‘सडोली खालसा’, ‘सांगरूळ’ जिल्हा परिषद मतदारसंघांवर दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांची पकड तर ‘यवलूज’, ‘कळे’ ‘बाजार भोगाव’ येथे चंद्रदीप नरके यांची पकड आहे. ‘गगनबावड्यात सतेज पाटील यांची मांड आहे. त्यामुळे ‘शिंगणापूर’, ‘वडणगे’, ‘शिये’ जिल्हा परिषद मतदारसंघ म्हणजेच ‘जुना करवीर’मधील मताधिक्यच आगामी आमदार ठरवणार, हे नक्की आहे.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Congress's Rahul Patil and Shindesena's Chandradeep Narake are fighting In Karveer Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.