कोल्हापूर/पाचगांव : काँग्रेस पक्षाचा झेंडा घरावर लावण्यास नकार आणि झेंडा का लावला, अशा कारणावरून पाचगांव (ता. करवीर) येथे शुक्रवारी दोन राजकीय गटांतील कार्यकर्त्यांत जोरदार मारामारी झाली. मारामारीत काठी, फायटर, लोखंडी सळईचा वापर झाला असून या प्रकरणी परस्परविरोधी फिर्याद करवीर पोलिसांत दाखल झाली. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या परिसरात बंदोबस्तात वाढवला. मारामारीत सुरेश बंडोपंत पाटील (वय ३५, रा.पाचगांव) हा गंभीर जखमी असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.साहिल केरबा उगळे (२०, रा. भैरवनाथ गल्ली, पाचगांव, ता. करवीर) याने दिलेल्या फिर्यादीनुसार संग्राम गोपाळ पाटील, शुभम गोपाळ पाटील, नारायण गाडगीळ आणि सुरेश पाटील (सर्व रा. पाचगांव, ता. करवीर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. विरोधी तक्रार साताप्पा श्रीकांत पाटील (३५, रा. भैरवनाथ गल्ली, पाचगांव, ता. करवीर) याने दाखल केली. त्यानुसार युवराज रामचंद्र उगळे, साहिल केरबा उगळे, विशाल आकाराम पोवार, संजय राजाराम पाटील (सर्व रा. पाचगांव, ता. करवीर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला.शुक्रवारी एक वाजण्याच्या सुमारास पाचगाव येथे शुभम पाटील, समीर जांभळे, ओंकार पोवार हे काँग्रेस पक्षाचा प्रचार करत होते. त्यावेळी फिर्यादी उगळे याने आपल्या घरावर कोणत्याही पक्षाचा झेंडा लावण्यास विरोध केला असता त्याच्या घरावर झेंडा लावून कार्यकर्ते निघून गेले. त्यानंतर उगळे यांनी हा झेंडा काढून ठेवला. ही माहिती कळताच संशयित गुन्हा दाखल झालेल्या चौघे पुन्हा झेंडा लावण्यासाठी गेले असता उगळे यांनी विरोध केला. त्यावेळी चार संशयितांनी फिर्यादीस शिवागीळ करून धक्काबुक्की करून काठीने मारहाण केली.फिर्यादी साताप्पा पाटील यांचे मित्र सुरेश बंडोपत पाटील भैरवनाथ गल्लीतून जात असताना त्याची मोपेड अडवून संशयितांनी त्यांना शिवीगाळ केली. तुला मस्ती आली आहे का, तू आमच्या घरासमोर झेंडे लावतो, तुला आता बघून घेतो, अशी धमकी देऊन संशयित युवराज उगळे याने फायटरसारख्या हत्याराने सुरेश यांच्या तोंडावर मारल्याने ते जखमी झाले. साहिल उगळे, विशाल पोवार यांनीही लोखंडी सळीने मानेवर, डोक्यावर आणि पोटावर मारले. संजय पाटील यानेही काठीने मारहाण केली. जखमीला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने खासगी रुग्णालयात दाखल केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
Vidhan Sabha Election 2024: काँग्रेसच्या झेंड्यावरुन पाचगावात मारामारी, कोल्हापुरात राजकीय वातावरण तापले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 3:04 PM