कोल्हापूर : सध्या मुलींना मोफत शिक्षण दिले जात असले तरी मुलांनी काय घोडे मारले आहे. त्यांनाही अशा शिक्षणाची नितांत गरज असून महाविकास आघाडी सत्तेत आल्यास मुलांना सर्व प्रकारचे मोफत शिक्षण देणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी आदमापूर (ता. भुदरगड) येथे केली.उद्धवसेनेचे उमेदवार के. पी. पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ठाकरे यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. खासदार शाहू छत्रपती, विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर हिंदु-मुस्लीम व इतर समाजात तेढ निर्माण करून तोडा आणि फोडा नितीने भाजपचे सरकार सत्तेत बसण्याची स्वप्ने बघत आहे. राज्यातील सगळे उद्योग गुजरातला नेले जात असून मुंबईसह महाराष्ट्र त्यांना लुटून न्यायचा आहे. मात्र, हे राज्य स्वाभिमानी असून ते कधीही तुटु आणि लूटू देणार नाही. मी मुख्यमंत्री असताना त्यांना महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहू दिले नाही. माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात एकही उद्योग राज्याबाहेर जाऊ दिला नाही. हेच खुपल्याने भाजपने माझे सरकार पाडले.आता चेल्याचपाट्यांना बसवून ते महाराष्ट्र लुटत आहेत. अशा महाराष्ट्रद्रोह्यांना जागा दाखवण्याची वेळ आली आहे. मुलींना मोफत शिक्षण दिले जात असले तरी महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुलांनाही मोफत शिक्षण देणार आहे. माझे सरकार पाडले नसते तर मी पुन्हा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असती.
प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराज यांचे मंदिर उभारणारभाजप सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार केला. मंत्री, राज्यपालांनी महाराजांचा वारंवार अपमान केला. महाराजांचा अवमान जनता विसरलेली नाही. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर उभारणार असल्याची घोषणा करत ठाकरे यांनी याच मंदिरात महाराजांचा अवमान करणाऱ्यांना नाक घासायला लावणार असल्याचा इशारा दिला. गद्दारांना ज्या सुरतमध्ये ठेवले होते त्या सुरतमध्येही महाराजांचे मंदिर उभे करणार, भाजपच्या नेत्यांनी मला अडवून दाखवावे, असे आव्हानही ठाकरे यांनी दिले.
जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवूलाडकी बहीण योजनेच्या पैशामुळे राज्यातील एका तरी कुटुंबांचे समाधान झाले आहे का, असा सवाल ठाकरे यांनी विचारला. महागाईमुळे जनता त्रस्तू असून महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यास जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार असल्याचा शब्द त्यांनी दिला.
तीन भाऊ, जाऊ तिथे खाऊराज्यात देवा भाऊ, दाढीवाले भाऊ व जॅकेटवाले भाऊ असे तीन भाऊ असले तरी त्यांची जाऊ तिथे खाऊ ही पद्धत आहे.
बाळूमामांचे घेतले दर्शनउद्धव ठाकरे व पुत्र तेजस ठाकरे यांनी सभेला येण्यापूर्वी आदमापूर येथील बाळूमामांचे दर्शन घेतले. धनगरी ढोल वाद्यांच्या निनादात त्यांचे मंदिरापासून सभास्थळापर्यंत स्वागत करण्यात आले. यावेळी घोंगडे, काठी देऊन के. पी. पाटील यांनी ठाकरे यांचा सत्कार केला.