कागल : कागल, गडहिंग्लज, उत्तुर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी निवडणूक आयोगास आपल्या संपत्तीचे विवरणपत्र सादर केले आहे. शेती वगळता त्यांची संपत्ती १५ कोटी ९८ लाख १८ हजार रुपये आहे. त्यांच्या नावावर कागल, करनूर, साके या गावात मिळून दहा एकर २४ गुंठे शेती आहे. तर पत्नी सायराबी मुश्रीफ यांची एकूण संपत्ती सहा कोटी दोन लाख ७७ हजार आहे. त्यांच्या नावावरही दहा एकर ३२ गुंठे शेती आहे. विशेष म्हणजे या दोघांच्या नावावर कोणतेही वाहन नाही.यामध्ये ठेवी, शेअर्स, गुंतवणूक, सोने-चांदी, स्थावर मालमत्ता, इमारती आदींचा समावेश आहे. मंत्री मुश्रीफ यांच्यावर आठ लाख ७४ हजार रुपयांचे कर्ज तर पत्नीच्या नावे सत्तर लाख ८१ हजार रुपये कर्ज आहे. मंत्री मुश्रीफ यांच्याकडे १५ तोळे चाळीस ग्रॅम सोने तर पत्नीकडे ४२ तोळे सोने व आठ लाख रुपये किमतीची चांदी आहे. मंत्री मुश्रीफ यांच्याकडे रोख पाच लाख ८७ हजार रुपये तर पत्नीकडे रोख दोन लाख रुपये आहेत. मुश्रीफ यांच्याकडे ७३ हजार रुपयांचे शेअर्स तर पत्नीकडे १५ लाख ६१ हजार रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे संस्थांचे शेअर्स आहेत.
मंत्री हसन मुश्रीफ नावावर वाहन नाही, एकूण संपत्ती किती.. जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 1:51 PM