गारगोटी : आमची पिढीजात आणि स्वकमाईची संपत्ती किती आहे, हे जगजाहीर आहे; मात्र बिद्री साखर कारखान्याच्या सर्वसामान्य कामगाराचे पुत्र असलेल्या आणि १० वर्षांपूर्वी केवळ २० गुंठ्यांचा सातबारा असलेल्या आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे हजारो एकर जमीन आली कुठून..? असा थेट सवाल माजी आमदार के. पी. पाटील यांनी केला. त्यांनी अमाप संपत्तीचे रहस्य कुलदेवतेची शपथ घेऊन जनतेसमोर सांगावे, असाही टोला पाटील यांनी लगावला. पुष्पनगर येथील प्रचारसभेत बुधवारी ते बोलत होते.पाटील म्हणाले, पहिल्या निवडणुकीत लोकांनी वर्गणी काढून निवडून दिले, असे सांगणारे आबिटकर आता त्याच लोकांना पैशांचे आमिष दाखवून मतदारांची थट्टा करीत असल्याचे विदारक चित्र आहे. मात्र राधानगरीची जनता स्वाभिमानी असून, या आमिषाला बळी पडणार नाही. जेथे मिळतील तेथे जमिनी घेणाऱ्या आमदार आबिटकर यांनी १० वर्षे समाजसेवेचा नकली बुरखा घातला होता. मात्र आता त्यांंचा खरा भ्रष्टाचारी चेहरा निवडणुकीत समोर आला आहे.रणजित बागल म्हणाले, ‘मतदारांच्या पवित्र मतांची किंमत तुम्ही ५० खोके केल्याने तुमच्या गद्दार वृत्तीचा जनता पोलखोल करील.’ राहुल देसाई, आर. बी. देसाई, विश्वनाथ कुंभार, शामराव देसाई, आदींची भाषणे झाली. सचिन घोरपडे, के. ना. पाटील, सुरेश नाईक, प्रकाश पाटील, दयानंद भोईटे, डी. एस. देसाई, अविनाश शिंदे, प्रसाद पिलारे, आदी उपस्थित होते. राजेंद्र देसाई यांनी आभार मानले. सभेपूर्वी सोनारवाडी, सालपेवाडी, मडूर, राणेवाडी, मांढरेवाडी, गडबिद्री, हेळेवाडी, लहान बारवे, आदी गावांचा प्रचारदौरा झाला.
श्रीमंतांच्या यादी येण्यासाठी स्पर्धा !आमदार आबिटकर यांचे सर्व आकडे कोटींत असतात. जागेपणी आणि झोपल्यावरही त्यांच्या तोंडी कोटीचीच भाषा असल्याची मिस्कील टीका माजी आमदार के. पी. पाटील यांनी केली. आमदार झाल्यापासून गेल्या दहा वर्षांत त्यांची कोटींची उड्डाणे सुरू असून श्रीमंतांच्या यादीत नाव झळकण्यासाठी स्पर्धा सुरू असल्याची टीका त्यांनी केली.