पोपट पवार कोल्हापूर : राजकारणात निवडणुका जिंकायच्या असतील तर कार्यकर्त्यांना पदांची आश्वासने देऊन आपल्याकडे खेचण्याचे उद्योग नवे नाहीत. पूर्वीचे नेते शब्दाचे पक्के असल्याने ते कार्यकर्त्यांना आश्वासने कमी द्यायचे, पण दिलेला शब्द ते हमखास पाळायचे. सध्याच्या राजकारणात मात्र झाडून सगळे नेते कोपराला गूळ लावून कार्यकर्त्यांना आमिष दाखवण्यात चांगलेच माहीर झाले आहेत. एका एका जिल्ह्यात तीन- चार जणांना विधानपरिषद, कुणाला महामंडळ, कुणाला देवस्थानचे अध्यक्ष अशी पदांची आमिषे दाखवून आपल्याकडे वळवून घेतले जात आहे.कोल्हापूर जिल्ह्यात ज्यांना तरण्या वयात विधानपरिषदेचा शब्द दिला होता त्यांची साठी ओलांडली तर ही पदे अजूनही त्यांच्या पदरात पडली नसताना आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर अनेकांच्या कोपराला गूळ लावून ठेवला जात आहे. ऐन विधानसभेच्या तोंडावर बंडखोरीची भाषा करणाऱ्यांना पदे देण्याचा शब्द देत त्यांचे बंड शांत केले जात आहेत. काहींना दुसऱ्या पक्षाचा झेंडा खाली ठेवून आपला हाती घेण्यासाठीही आश्वासनांची खैरात केली आहे. ऐन विधानसभेच्या तोंडावर सगळ्याच पक्षांनी अनेक भावी आमदार, नामदार केले असले तरी ते प्रत्यक्षात त्यांना ती पदे मिळतात का?, दिलेला शब्द नेते पाळतात का? हेही पाहावे लागणार आहे.
हाळवणकरांना विधानपरिषदेचा शब्दइचलकरंजी मतदारसंघातून भाजपकडून प्रमुख दावेदार असणाऱ्या माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना पक्षाने यंदा थांबवून राहुल आवाडे यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या हाळवणकर यांना डावलले असले तरी त्यांना पक्षाने विधानपरिषदेचा शब्द दिला आहे. या मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल काय लागतो यावरच त्यांची आमदारकी ठरणार आहे.'सत्यजित' यांना महामंडळकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी आग्रही असलेले भाजपचे सत्यजित कदम यांनी नुकताच शिंदेसेनेत प्रवेश केला. भाजपमध्ये चांगले रुळलेल्या कदम यांना शिंदेसेनेने राज्य नियोजन महामंडळाच्या अध्यक्षपदाचा शब्द दिल्यानेच त्यांनी रातोरात धनुष्यबाण ताणल्याचे कळते. पण 'उत्तर'चे उत्तर काय मिळते यावरच कदम यांना दिलेल्या आश्वासनाचे भवितव्य अवलंबून आहे.सावकारांचा 'स्वाभिमान' शिंदेसेना जपणार का?माजी खासदार राजू शेट्टी यांचे एकनिष्ठ शिलेदार असणाऱ्या सावकार मादनाईक यांनीही शेट्टी यांची साथ सोडत शिंदेसेना जवळ केली आहे. स्वाभिमानीचे एक एक शिलेदार तंबू सोडून जात असताना मादनाईक मात्र त्या तंबूचा मजबूत खांब म्हणून उभे होते. आता शिंदेसेना त्यांचा 'स्वाभिमान' जपणार का? याचे उत्तर काळच देणार आहे.
जयश्री जाधव यांना दिले उपनेतेपदकोल्हापूर उत्तरच्या आमदार जयश्री जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने त्यांनीही शिंदेसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. पक्षात प्रवेश केल्यानंतर दुसऱ्याच क्षणी त्यांना उपनेतेपदही बहाल करण्यात आले. ज्यांच्या आमदारकीसाठी राज्यभरातील काँग्रेसने आपले सर्वस्व पणाला लावले होते त्यांचा 'हात' सोडून शिवधनुष्य उचललेल्या जाधव यांना शिंदेसेना काेणती बक्षिसी देणार हे पाहावे लागणार आहे.देसाई, पाटलांना कोणती बक्षिसीभाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी ऐन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा 'हात' पकडला आहे. राधानगरी मतदारसंघातून सुरुवातीला उमेदवारीची हवा करणारे देसाई सध्या के. पी. पाटील यांची मशाल प्रज्वलित करण्यासाठी झटत आहेत. याच मतदारसंघातील स्वाभिमानीचे राज्याध्यक्ष जालंदर पाटील यांनीही मंगळवारी शिंदेसेनेत प्रवेश केला. या दोघांना कोणती बक्षिसी मिळेल याची उत्सुकता आहे. प्रस्थापितांच्या विरोधात आयुष्यभर चळवळीचे राजकारण करणारे पाटील अखेर सत्तेपुढे नमलेच.