कोल्हापूर उत्तरच्या काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे यांच्याकडे ७७ लाखांचे सोने, एकूण मालमत्ता किती.. जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 01:43 PM2024-10-30T13:43:48+5:302024-10-30T13:45:46+5:30
कोल्हापूर : माजी आरोग्यमंत्री दिवंगत दिग्विजय खानविलकर यांची कन्या आणि कोल्हापूरच्या राजपरिवारातील सून असलेल्या मधुरिमाराजे छत्रपती यांच्याकडे ७१९ ग्रॅम ...
कोल्हापूर : माजी आरोग्यमंत्री दिवंगत दिग्विजय खानविलकर यांची कन्या आणि कोल्हापूरच्या राजपरिवारातील सून असलेल्या मधुरिमाराजे छत्रपती यांच्याकडे ७१९ ग्रॅम वजनाचे ७७ लाख ०६ हजार ०३९ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असल्याचे निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. त्यांच्या नावावर जंगम व स्थावर अशी एकत्रित एक कोटी ९० लाख ९० हजार ०८८ रुपयांची मालमत्ता आहे.
मधुरिमाराजे यांनी मंगळवारी कोल्हापूर उत्तरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. या उमेदवारी अर्जासोबत त्यांनी त्यांच्या संपत्तीविषयीचे प्रतिज्ञापत्रही निवडणूक आयोगाला सादर केले आहे. त्यात त्यांनी संपत्तीचे विवरण दिले आहे.
मधुरिमा यांच्या नावावर विविध बँकांतून ३६ लाख ८६ हजार २०९ रुपयांच्या ठेवी आहेत. त्यांनी शेअर बाजारात सात लाख ८० हजार ७२६ रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांच्या नावावर नऊ लाख ५० हजार रुपये किमतीचे वाहनदेखील आहे. ७७ लाख ०६ हजार ०३९ रुपये किमतीचे ७१९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्या वापरतात. याशिवाय त्यांच्या नावावर शेतीच्या रूपाने ५८ लाख ९९ हजार ११४ रुपयांची स्वत:चा अधिग्रहित मालमत्ता आहे.
त्यांच्या नावावरील संपूर्ण मिळकतीचे एकूण मूल्य एक कोटी ९० लाख ९० हजार ०८८ इतक्या रुपयांचे आहे. त्यांचे गत सालातील उत्पन्न ८६ हजार ९५० रुपयांचे आहे. मधुरिमा या कला शाखेच्या पदवीधर आहेत.