कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू असताना, मराठा समाजातील लोकांवर झालेला लाठीमार आणि गोळीबार मराठा समाज विसरलेला नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला गृहीत धरू नये, असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची आज शनिवारी कोल्हापुरातील गांधी मैदानात जाहीर सभा होणार आहे. या सभास्थळाची सतेज पाटील यांनी पाहणी दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे-पाटील ज्यावेळी मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले होते. त्यावेळी, पोलिसांनी केलेला लाठीमार आणि गोळीबार कोणी केला, हे मराठा समाजाला माहिती आहे. त्यामुळे राज्यातला मराठा समाज महायुतीला सहकार्य करणार नाही. उद्धव ठाकरे यांची बॅग तपासल्यानंतर देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याही बॅगा तपासल्या गेल्याचे व्हिडीओ समोर आले. मात्र, हा केवळ दिखावा असून, आम्ही कसे निष्पक्ष आहोत, हे दाखवण्याचा हा प्रयत्न सुरू असल्याची टीका पाटील यांनी केली. बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है असे मुद्दे महायुती सरकार जनतेला गृहीत धरून काढत आहे. मात्र, जनताच त्यांना जागा दाखवून देईल, असा इशाराही त्यांनी दिला.
Vidhan Sabha Election 2024: मराठा समाज लाठीचार्ज विसरलेला नाही - सतेज पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 3:29 PM