कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ फुटले असून, प्रचाराने गती घेतली आहे. राजकीय पक्षांनी आपापल्या स्टार प्रचारकांच्या सभांचे नियोजन केले आहे. साधारणत: सोमवार (दि. ११) पासून या सभा सुरू होणार असून, शेवटच्या आठवड्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार अमोल काेल्हे, उद्धवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह स्टार प्रचारक महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी मैदानात उतरणार आहेत.राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या सभांचे नियोजन उमेदवारांकडून सुरू झाले आहे. कोणत्या भागात कोणत्या नेत्यांचा प्रभाव पडू शकतो, याचा अंदाज घेऊन त्या नेत्यांना प्रचार सभेसाठी आणण्याचे नियोजन केले आहे. काॅंग्रेसकडून राष्ट्रीय नेते राहुल गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सभांचे नियोजन केले आहे. पण अद्याप प्रदेश काँग्रेसकडून अधिकृत सांगण्यात आलेले नाही.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पक्षाध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्या सभा होणार आहेत. उद्धवसेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, माजी मंत्री भास्करराव जाधव, सुषमा अंधारे, नितीन बानुगडे-पाटील यांच्या सभांचे नियोजन केले आहे.
बानुगडे-पाटील, अंधारे, कोल्हेंना मागणीमहाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांकडून उद्धवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील, सुषमा अंधारे व खासदार अमोल कोल्हे यांना मागणी अधिक आहे. या स्टार प्रचारकांच्या सभा पुढील आठवड्यातच जिल्ह्यात होणार आहेत.