‘चंदगड’मध्ये बंडखोरांशीच होणार खरा सामना; पंचरंगी लढतीत अधिकृत उमेदवारांची दमछाक होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 03:52 PM2024-11-07T15:52:28+5:302024-11-07T15:53:17+5:30

बंडखोर उमेदवार कुणाची, किती मते खाणार यावरच निकाल अवलंबून

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 MLA Rajesh Patil, BJP's Shivaji Patil and Jansuraj Mansingh Khorate are fighting In Chandgad Assembly Constituency | ‘चंदगड’मध्ये बंडखोरांशीच होणार खरा सामना; पंचरंगी लढतीत अधिकृत उमेदवारांची दमछाक होणार

‘चंदगड’मध्ये बंडखोरांशीच होणार खरा सामना; पंचरंगी लढतीत अधिकृत उमेदवारांची दमछाक होणार

राम मगदूम

गडहिंग्लज : चंदगड विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी दोन्ही बाजूला बंडखोरी झाली आहे. दोन्हीकडे मित्रपक्षांनीच वेगळी चूल मांडल्यामुळे अधिकृत उमेदवारांची मोठी दमछाक होणार आहे. बंडखोर उमेदवार कुणाची, किती मते खाणार यावरच निकाल अवलंबून आहे. असेच चित्र माघारीनंतर स्पष्ट झाले आहे.

महायुतीचे आमदार यांना राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्याविरोधात भाजपचे शिवाजी पाटील आणि जनसुराज्यचे मानसिंग खोराटे यांनी बंडखोरी केली आहे. माजी मंत्री भरमूअण्णा पाटील हेदेखील शिवाजीरावांच्या पाठीशीच आहेत.

भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य संग्रामसिंह कुपेकर, गडहिंग्लज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी युती धर्म पाळून राजेश पाटील यांचा प्रचार सुरू केला आहे. परंतु, भाजपचे अनेक पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते शिवाजीराव पाटील यांच्याबरोबरच आहेत.

विरोधी महाविकास आघाडीची उमेदवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नंदिनी कुपेकर यांना मिळाली आहे. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे अप्पी पाटील यांनी बंडखोरी केली आहे. त्यांना काँग्रेसचे गोपाळराव पाटील व कल्लाप्पा भोगण, उद्धवसेनेचे प्रभाकर खांडेकर, श्रमीक मुक्ती दलाचे कॉ. संपत देसाई, कॉ. संजय तर्डेकर, बळीराजा शेतकरी संघटनेचे नितीन पाटील यांनी पाठबळ दिले आहे. त्यामुळे नंदाताईसमोरही स्वकियांचेच तगडे आव्हान आहे.

दोन अधिकृत आणि तुल्यबळ तीन बंडखोरांमुळे ही निवडणूक पंचरंगी होत आहे. वंचित व ‘बसपा’नेही उमेदवार दिले असून, अन्य १० अपक्षदेखील रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वाधिक उमेदवारांच्या या मतदारसंघात आश्चर्यकारक निकाल लागल्यास नवल वाटायचे कारण नाही.

आमदारांसमोर दुहेरी आव्हान

विद्यमान आमदार राजेश पाटील यांना महायुतीची अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. मात्र, त्यांच्याविरोधात भाजपचे शिवाजीराव पाटील यांनी शड्डू ठोकला आहे. तद्वत भाजपचा मित्रपक्ष राहिलेल्या जनसुराज्यने मानसिंग खोराटे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अजित पवार समर्थक आमदार पाटील यांच्यासमोर दुहेरी आव्हान आहे.

राजकीय उलथापालथ

  • गेल्यावेळी राजेश पाटील यांना माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी साथ दिली होती. त्यांच्या कन्या नंदाताईंनीच त्यांना आव्हान दिले असून, कुपेकर समर्थक उदय जोशी हे त्यांच्या प्रचाराचे तर जयसिंग चव्हाण हे आमदार पाटील यांच्या प्रचाराचे सूत्रधार आहेत.
  • गेल्यावेळी शिवाजीराव पाटील यांच्यासोबत राहिलेले गोपाळराव पाटील यावेळी अप्पी पाटील यांच्याबरोबर असून, उद्धवसेनेतर्फे लढलेले संग्राम कुपेकर यावेळी राजेश पाटील यांच्यासोबत आहेत.
  • गेल्यावेळी एकट्यानेच ‘वंचित’कडून लढलेल्या अप्पी पाटील यांना यावेळी गोपाळराव पाटील, कल्लाप्पा भोगण, प्रभाकर खांडेकर, संपत देसाई, नितीन पाटील यांची साथ मिळाली आहे.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 MLA Rajesh Patil, BJP's Shivaji Patil and Jansuraj Mansingh Khorate are fighting In Chandgad Assembly Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.