कोल्हापूर : नेहमी वेगळा विचार करणारे नेते आमदार विनय कोरे यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाची स्थापना केली. त्यांनी आतापर्यंत पाचवेळा विधानसभा निवडणूक लढवली आणि त्यात चारवेळा ते जिंकले आहेत. याआधी त्यांनी २००४ नंतर अपारंपरिक ऊर्जा खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणूनही काम पाहिले होते. यंदा स्वत: कोरे आणि हातकणंगलेतून अशोकराव माने असे जनसुराज्य शक्तीचे दोन आमदार विधिमंडळात पोहोचले आहेत. यंदा जनसुराज्यच्या आमदारांची संख्या एकने वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी आपले स्थान आणखी भक्कम केले आहे.राज्याच्या राजकारणात निर्णायक भूमिका घेण्यासाठी विनय कोरे यांनी या पक्षाची स्थापना केली. पहिल्याच निवडणुकीत त्यांचे पाच आमदारही निवडून आले. परंतु नंतर त्यामध्ये सातत्य राहिले नाही. २०१९ ला कोरे एकटेच निवडून आले. परंतु त्यांनी यंदा जाणीवपूर्वक नियाेजन केले आणि स्वत:बरोबर अशोकराव माने यांनाही निवडून आणले. त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. करवीर मतदारसंघातील त्यांच्या पक्षाची उमेदवारी ही शिंदेसेनेच्या चंद्रदीप नरके यांच्यासाठी सोयीची ठरली. यातून कोरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही जवळ गेले आहेत. त्यामुळे कामे करून घेण्यात, प्रकल्प आणण्यात कोरे यशस्वी होतील, यात शंका नाही.परंतु आत्ताच राज्यात भाजप, काँग्रेस, दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी आणि जिल्ह्यात स्वाभिमानी असे प्रमुख पक्ष कार्यरत असताना जनसुराज्य शक्तीच्या विस्ताराला मर्यादा आहेत असे स्पष्ट दिसत आहे. या निवडणुकीत कोरे हे स्वत: शाहूवाडी मतदारसंघातून, हातकणंगलेतून अशोकराव माने, करवीरमधून संताजी घोरपडे आणि चंदगडमधून मानसिंग खोराटे निवडणूक लढवत होते. जिल्ह्यातील चार जागा लढवून त्यातील दोन जिंकून कोरे यांनी ५० टक्क्यांचा स्ट्राइक रेट ठेवला आहे.उमेदवार - मते
- विनय कोरे - १,३६,०६४
- अशोकराव माने - १, ३४, १९१
- संताजी घोरपडे - ७,९३१
- मानसिंग खोराटे - २२, १०७