कागल : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागल मतदारसंघातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी एका वृत्तवाहिनीने येथील गैबी चौकात आयोजित केलेल्या कार्यक्रमात पालकमंत्री हसन मुश्रीफ व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांच्या समर्थकांत जोरदार राडा झाला. ही घटना सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.यावेळी एकमेकांच्या अंगावर धावून जात हाणामारी केली. तसेच बांधकामासाठी आणलेल्या विटा एकमेकांवर फेकण्यात आल्या. यामध्ये दोघे किरकोळ जखमी झाले. यावेळी झालेल्या रेटारेटीत गैबी चौकात उभ्या असणाऱ्या काही दुचाकीही खाली पडल्या. दरम्यान, या घटनेची कोणतीही नोंद रात्री उशिरापर्यंत कागल पोलिस ठाण्यात झालेली नव्हती. या घटनेची अधिक माहिती अशी की, या मराठी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या या चर्चेत गटाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. प्रसिद्ध अभिनेते पंढरीनाथ कांबळे हे निवेदक होते. त्यांना पाहण्यासाठीही गर्दी झाली होती. सुरुवातीला वीस मिनिटे ही चर्चा व्यवस्थित सुरू होती. मात्र, एका साखर कारखान्याच्या विषयावर टीकाटिप्पणी होत गेल्याने जोरदार घोषणाबाजी सुरू झाली आणि वाद वाढत जाऊन हाणामारी सुरू झाली. काही कार्यकर्त्यांनी पॅडी कांबळे यांना तसेच वृतवाहिनीच्या प्रतिनिधींना सुरक्षितरीत्या तेथून बाजूला नेले.
हे झाले होते सहभागीमुश्रीफ गटाकडून भय्या माने, प्रकाश गाडेकर, प्रवीण काळबर, संजय चितारी, सौरभ पाटील, अमित पिष्टे आदींनी सहभाग घेतला होता, तर समरजित घाटगे गटाकडून बाळासाहेब हेगडे, राजेंद्र जाधव, रमेश मुजावर, प्रतीक कदम, साई ढोणे आदींनी भाग घेतला होता.अशा कार्यक्रमांना आता परवानगी नाहीपोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार म्हणाले, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जर अशा खुल्या चर्चासत्राच्या कार्यक्रमातून होणार असेल तर प्रशासनाने या कार्यक्रमांना परवानगी देऊ नये यासाठी आपण दक्षता घेणार आहोत. तसेच या घटनेची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल.