यवलूज : करवीरमध्ये दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या पक्षनिष्ठेची पुण्याई आणि निष्ठावंतपणाचे जोरदार इंजेक्शन बसले आहे. इथे राहुल पाटलांच्या विरोधात लढणाऱ्या उमेदवाराने खोटे बोलण्याची मर्यादा ओलांडली आहे. पी. एन. पाटील यांनी तयार केलेली निष्ठावंतांची फौज आणि पी. एन. नावाची मोठी एफडी आमच्याकडे आहे. याउलट विरोधी उमेदवार खोटेनाटे आरोप करून बुद्धिभेदाचे राजकारण करत आहेत, ही लबाडी संपविण्यासाठी राहुल पाटील यांना मताधिक्याने विधानसभेत पाठवा, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.राहुल पाटील यांच्या प्रचारार्थ यवलूज (ता.पन्हाळा) येथे प्रचारसभेत ते बोलत होते. सभेला प्रचंड गर्दी उसळली होती. सतेज पाटील म्हणाले, अलीकडे काहीजण म्हणतात की, मी यांचे बोट धरून राजकारणात आलो. पण, तुमचे बोट धरून राजकारणात यायला बंटी पाटील एवढा कच्चा नाही. पन्हाळ्यातील संस्थांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांवर दबावाचे राजकारण केले, तर त्या सहकारी संस्थेचा प्रमुख बंटी पाटील आहे, हे त्यांनी ध्यानात ठेवावे. कुंभीच्या निवडणुकीत बंटी पाटलांची तुम्हाला का गरज लागली, हे जाहीर करा. या निवडणुकीत गद्दाराचा पराभव अटळ आहे.राहुल पाटील म्हणाले, विरोधकांच्या पापाचा घडा भरला आहे. गद्दाराला गाडायचा निर्धार जनतेने केला आहे त्यामुळे मला करवीर, गगनबावडा सोबतच पन्हाळ्यातून सुद्धा मताधिक्य मिळेल, असे वातावरण आहे.डॉ. चेतन नरके म्हणाले, दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांनी पन्हाळा तालुक्यासाठी भरघोस निधी देऊन इथला विकास केला. त्यामुळे पन्हाळकरांनो राहुल यांना आमदार करण्यासाठी कुठेही कमी पडू नका. विरोधी उमेदवार म्हणतात सतेज पाटील माझे बोट धरून राजकारणात आले, पण हे ज्यांच्या बोटाला धरून राजकारणात आले त्यांचे नाव घेताना कसली लाज वाटते, हे स्पष्ट करा. डी. जी. भास्कर, दादू कामिरे, शशिकांत आडनाईक, बाजीराव देवाळकर, सुहास राऊत, भरत मोरे यांची भाषणे झाली. श्रीकांत बोरे यांनी स्वागत केले.
पी. एन. पाटील यांच्या पुण्याईवरच राहुल पाटील यांचा विजय निश्चित, आमदार सतेज पाटील यांचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 1:20 PM