कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू तसेच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे शिवसेनेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. क्षीरसागर आज, सोमवारी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.राजेश क्षीरसागर यांनी यापूर्वी कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे २००९, २०१४ मध्ये प्रतिनिधित्व केले होते. २०१९ मध्ये त्यांना विजयाची हॅटट्रिक करण्याची संधी होती, तशी त्यांनी हवादेखील तयार केली होती, परंतु ऐनवेळी भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या उद्योगपती चंद्रकांत जाधव यांनी त्यांच्या हॅटट्रिकचा रथ रोखला होता.पराभव झाल्यानंतर क्षीरसागर यांनी शिवसेनेबरोबरचे आपले नाते कायम ठेवले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर मिळालेल्या राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कामाचा ठसा उमटविला. राज्यभर फिरून त्यांनी काम केले. त्यांचे कोल्हापूर मतदारसंघावरही लक्ष होते. राज्यात अनपेक्षित सत्तांतर झाले आणि क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. गुवाहाटीला जाऊन त्यांनी शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला. त्याचे फळ म्हणून शिंदे यांनी नियोजन मंडळावरील नियुक्ती कायम केलीच शिवाय आता शिवसेनेकडून चौथ्यांदा उमेदवारी दिली.अडचणीच्या काळात दिलेली साथ उपयोगी पडली‘कोल्हापूर उत्तर’वर क्षीरसागर यांच्यासह भाजपकडून सत्यजित कदम, कृष्णराज महाडिक यांनीही हक्क सांगितला होता. जागा भाजपला सुटणार नसेल तर आम्हाला शिवसेनेत घेऊन उमेदवारी द्या, असाही आग्रही त्यांनी धरला होता. परंतु अडचणीच्या काळात खंबीर साथ दिल्याचे लक्षात ठेवत शिंदे यांनी क्षीरसागर यांनाच उमेदवारी दिली. शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित बैठक घेऊन महाडिक, कदम यांची समजूत काढून क्षीरसागर यांच्या प्रचार कार्यात सहभागी होण्याच्या सूचना दिल्या.
कोल्हापूर उत्तरमधून शिंदेसेनेकडून राजेश क्षीरसागरच, चौथ्यांदा निवडणूक रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 12:27 PM