काँग्रेसकडून ऋतुराज, राहुल पाटील, राजूबाबा आवळे यांना उमेदवारी जाहीर, ‘कोल्हापूर उत्तर’ची मात्र प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 11:57 AM2024-10-25T11:57:17+5:302024-10-25T11:58:32+5:30
कोल्हापूर : काँग्रेसने जिल्ह्यातील तीन उमेदवारांची गुरुवारी रात्री घोषणा केली. कोल्हापूर दक्षिणमधून आमदार ऋतुराज पाटील , हातकणंगलेतून आमदार राजूबाबा ...
कोल्हापूर : काँग्रेसने जिल्ह्यातील तीन उमेदवारांची गुरुवारी रात्री घोषणा केली. कोल्हापूर दक्षिणमधून आमदार ऋतुराज पाटील, हातकणंगलेतून आमदार राजूबाबा आवळे आणि करवीर मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. या तिघांचीही उमेदवारी निश्चित मानली जात होती. त्यामुळेच गुरुवारी ऋतुराज पाटील आणि राहुल पाटील यांनी अर्जही दाखल केले. मात्र काँग्रेसला अजूनही ‘कोल्हापूर उत्तर’साठी तगडा उमेदवार मिळालेला नाही.
काँग्रेसचे विधान परिषदेचे नेते सतेज पाटील यांचे ऋतुराज हे पुतणे असून डी. वाय. पाटील समूहाचे प्रमुख डॉ. संजय डी. पाटील यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव आहेत. त्यांनी २०१९ च्या निवडणुकीत तत्कालिन आमदार अमल महाडिक यांचा ५३ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. पाटील हे दुसऱ्यांदा रिंगणात उतरत असून पुन्हा पाटील महाडिक लढत रंगणार आहे.
काँग्रेसचे दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे राहुल हे चिरंजीव असून पाटील यांच्या निधनानंतर राहुल हेच त्यांचे राजकीय वारसदार असणार हे नक्की होते. राजीव गांधी सूतगिरणीचे अध्यक्ष असलेल्या राहुल यांनी दोन वर्षे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सांभाळले. ते पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरत आहेत. पाटील यांच्याविरोधात शिंदेसेनेचे चंद्रदीप नरके आणि जनसुराज्यचे संताजी घोरपडे हे रिंगणात असतील.
माजी मंत्री जयवंतराव आवळे यांचे चिरंजीव असलेले राजूबाबा हे दुसऱ्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरत आहेत. त्यांनी गेल्यावेळी शिवसेनेचे तत्कालीन आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांचा सहा हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. आता पुन्हा डॉ. मिणचेकर रिंगणात उतरण्याची शक्यता असून जनसुराज्यचे अशोकराव माने यांची उमेदवारी निश्चित आहे.