Karvir Vidhan Sabha Election 2024: ‘करवीर’च्या नभी ‘चंद्रदीप’; राहुल पाटील यांची निकराची झुंज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 06:47 PM2024-11-24T18:47:59+5:302024-11-24T18:49:09+5:30
श्वास रोखून धरायला लावणाऱ्या लढतीत १९७६ मतांनी विजयी :
प्रकाश पाटील
कोपार्डे : अंत्यत अटीतटीने झालेल्या करवीर विधानसभा मतदारसंघात शिंदेसेनेचे चंद्रदीप नरके यांनी काँग्रेसचे राहुल पाटील यांचा अवघ्या १९७६ मताधिक्यांनी पराभव केला. गेल्या पाच वर्षात घेतलेली मेहनत, आक्रमक राबवलेली प्रचार यंत्रणा आणि लाडक्या बहिणींचा आशीर्वाद यामुळे नरके तिसऱ्यांदा विधानसभेत पोहचले आहेत. तर, दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्याबद्दलची सहानुभूतीच्या बळावर राहुल पाटील यांनी निकराची झुंज दिली. पण, थोडक्यात पराभव पत्कारावा लागला.
सकाळी आठपासून ‘करवीर’च्या मतमोजणीला शासकीय बहुउद्देशीय सभागृहात सुरुवात झाली. टपाली मतदानामध्ये राहुल पाटील यांनी आघाडी घेतली. मतदान यंत्रावरील मोजणीस पन्हाळ्यातून सुरुवात झाली. येथे अपेक्षेप्रमाणे नरके यांनी आघाडी घेतली. पन्हाळ्यातील सहा फेरीमध्ये नरके यांनी ११ हजार २७२ चे मताधिक्य घेतले. गगनबावडा तालुक्यातील तीन फेरीत काँग्रेसचे राहुल पाटील यांनी ३४७० चे मताधिक्य मिळाले. त्यामुळे, नरके ७९१९ चे मताधिक्य घेऊन करवीरमध्ये आले. येथे आल्यावरही नरके यांनी आघाडी कायम राखली.
बाराव्या फेरीअखेर नरके यांचे १२ हजार ७२१ चे मताधिक्य राखले. त्यानंतर सडोली खालसा, परिते परिसरात पाटील यांनी मताधिक्य कमी करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना विजयापर्यंत पोहचता आले नाही. शेवटच्या फेरीअखेर १९७६ इतक्या मताधिक्यांनी विजयावर मोहर उमटवली.
दरम्यान, सायंकाळी चार वाजता अंतिम निकाल निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वर्षा शिंगण यांनी जाहीर केला. अतिशय शांततेत व विना तक्रार मतमोजणी प्रक्रिया पार पडली, करवीरचे पाेलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी चोख बंदोबस्त ठेवला हाेता.
विजयाची कारणे
- पराभूत होऊनही पाच वर्षात ठेवलेला संपर्क
- मित्र पक्षांना सोबत घेऊन राबवलेली आक्रमक प्रचार यंत्रणा
- लाडकी बहीण, वयोश्री व श्रावणबाळ योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी
पराभवाची कारणे
- ‘पी. एन.’ यांची सहानूभूतीपण, जुन्या करवीरमधील जोडण्या कमी पडल्या
- विरोधकांवर आक्रमकपणे हल्ला करण्यात कमी
- जनसुराज्य पक्षाचे संताजी घोरपडे यांच्या उमेदवारीचा फटका
‘करवीर’चा नरकेंना हात
चंद्रदीप नरके यांना पन्हाळ्यातून अपेक्षित मताधिक्य न मिळाल्याने त्यांची धाकधूक वाढली होती. मात्र, मागील तीन निवडणुकांपेक्षा यावेळेला जुन्या ‘करवीर’ करांनी नरके यांना हात दिल्याने काँग्रेसच्या हाताला फटका बसल्याची चर्चा आहे. येथे ९५०० चे मताधिक्य राहिले.
नरकेंना पन्हाळ्यात झटका
पन्हाळा हा चंद्रदीप नरके यांचा बालेकिल्ला, पण मागील निवडणूकीपासून बालेकिल्ला ढासळू लागला. नरके यांनी केलेली मेहनत पाहता त्यांना येथून किमान १७ हजाराचे मताधिक्य राहील, अशी त्यांच्या समर्थकांची अपेक्षा होती. पण केवळ ११ हजार २७२ चे मताधिक्य राहिले, मागील निवडणूकीपेक्षाही हे मताधिक्य कमी राहिले.
‘राहुल’ यांचे गगनबावड्यातील मताधिक्य घटले
गगनबावडा तालुका आमदार सतेज पाटील यांची प्रतिष्ठेचा केला होता, पण तिथे जाऊन चंद्रदीप नरके यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला होता. त्यात त्यांना जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पी. जी. शिंदे यांची साथ मिळाल्याने पाटील यांना अपेक्षित असलेले ७ हजारांचे मताधिक्य मिळाले नाही.
दृष्टिक्षेपात मतदान -
- एकूण मते - ३,२५,१६१
- मतदान यंत्रावर झालेली मते : २,७६,२४५
- पोस्टल मते : २६८४
- पोस्टल अवैध : २४५
- एकूण झालेली मते : २,७८,९२९
- वैद्य मते : २,७८,६८४
शिवसेना संपवण्याचे मनसुबे बाळगणाऱ्या नेत्यांची काँग्रेस संपली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ‘करवीर’च्या जनतेने माझ्यावर विश्वास टाकला, त्यास पात्र राहून काम करू. माझ्या विजयात महायुतीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांचे योगदान मोलाचे असून मी त्यांचा ऋणी आहे. -चंद्रदीप नरके (आमदार)
‘करवीर’च्या जनतेने दिलेला कौल मान्य असून आगामी काळात दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे विकासाचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न राहू. - राहुल पाटील