महायुती सरकार सत्तेतून पायउतार होईल, मल्लिकार्जुन खर्गे यांचा विश्वास  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 12:56 PM2024-11-18T12:56:24+5:302024-11-18T12:58:03+5:30

राज्याला स्थिर सरकार देणार

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 The Mahayuti government will step down from power, believes Mallikarjuna Kharge   | महायुती सरकार सत्तेतून पायउतार होईल, मल्लिकार्जुन खर्गे यांचा विश्वास  

महायुती सरकार सत्तेतून पायउतार होईल, मल्लिकार्जुन खर्गे यांचा विश्वास  

कोल्हापूर : पन्नास खोके एकदम ओकेवाले हे महायुतीचे सरकार आता सत्तेतून पायउतार होईल. एक सक्षम आणि स्थिर सरकार आम्ही महाराष्ट्र राज्यात देऊ, असा विश्वास काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. सांगली येथील सभेसाठी गेलेल्या खर्गे यांनी कोल्हापूर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला.

खर्गे म्हणाले, महाराष्ट्रातील निवडणुकांच्या निमित्ताने, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई या ठिकाणी मी गेलो आहे, या ठिकाणी जनतेचा चांगला प्रतिसाद महाविकास आघाडीला मिळत आहे. महायुती सरकारला जनता कंटाळली आहे. महाविकास आघाडीतील सर्व नेते मिळून आम्ही मुख्यमंत्री ठरवू. आमच्यात कोणताही वाद नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, कर्नाटकचे आमदार हसन मौलाना, माजी आमदार अंजली निंबाळकर उपस्थित होते.

तिकडे जळीतकांड.. तुम्ही प्रचारात..

उत्तर प्रदेशमधील झांसी येथील रुग्णालयात दहा चिमुकल्यांचा जळीत कांडात जीव गेला..मणिपूरमध्ये लोकांना मारले जात आहे. जाळले जात आहे. मात्र, योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात प्रचार करत फिरत आहेत या शब्दांत खर्गे यांनी योगींवर हल्ला चढवला.

खोके सब ओके भी नही

भाजपला हरवण्यासाठी आम्ही एक झालो आहोत. त्यामुळे महाराष्ट्रात सरकार बनवताना कोणतीही अडचण येणार नाही. महाराष्ट्रात आमचे सरकार बनवणार, राज्यातल्या जनतेला नवीन सरकार आम्ही देणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोणताही घोडेबाजार होणार नाही. ज्यांना आम्ही संधी दिली आहे ते कुठेही जाणार नाहीत.. खोके सब ओके भी नही है.. असा टोलाही त्यांनी महायुती आघाडीला लगावला.

खुर्ची डळमळीत असल्यानेच तालुका पातळीवर सभा

आम्हीदेखील खूप निवडणुका पाहिल्या आहेत. मात्र, राज्यस्तरावरील निवडणुकासाठी कधी आम्ही गेलो नाही. देशाचं काहीतरी भले करण्यासाठी तुम्हाला जनतेने निवडले आहे. मात्र पंतप्रधानांची खुर्ची डळमळीत असल्यानेच ते सत्ता वाचवण्यासाठी आता तालुका पातळीवरदेखील जात आहेत. अशी टीकाही त्यांनी केली.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 The Mahayuti government will step down from power, believes Mallikarjuna Kharge  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.