कोल्हापूर : काँग्रेसमधून बंडखोरी केलेल्या राजेश लाटकर यांच्या माघारीकडे सर्वांच्या नजरा खिळून राहिल्या असताना अचानक काँग्रेसच्याकोल्हापूर उत्तर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनीच अनपेक्षितपणे लढण्यापूर्वीच निवडणूक रिंगणातून माघार घेऊन सर्वांना धक्का दिला. मधुरिमा यांच्या माघारीवरून खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील यांच्यात शाब्दिक खडाजंगी उडाली. शाहू छत्रपती आणि आमदार पाटील प्रचंड संतापले होते. ज्या नाट्यमय घडामोडीनंतर मधुरिमांना उमेदवारी देण्यात आली, तशाच नाट्यमय घडामोडीनंतर त्यांना माघारसुद्धा घ्यावी लागल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यानिमित्ताने काँग्रेस पक्षातील वादही चव्हाट्यावर आला.कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील राजकारणाला सोमवारी अनपेक्षित कलाटणी मिळाली. काँग्रेसमधून बंडखोरी केलेल्या राजेश लाटकर यांनी माघार घ्यावी म्हणून सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून प्रयत्न सुरू झाले होते. सकाळी सात वाजता काही माजी नगरसेवक लाटकर यांच्या घरी जाऊन बसले होते. आमदार सतेज पाटील यांच्या निवासस्थानी जमायचे ठरले होते. लाटकर यांनी ‘तुम्ही पुढे चला मी अंघोळ करून येतो’ असे सांगून नगरसेवकांना घरातून घालविले. त्यानंतर लाटकर ‘नॉट रिचेबल’ झाले. त्यांची शोधाशोध सुरू झाली. जसं जसा वेळ निघून जाईल तशी काँग्रेस कार्यकर्त्यांत अस्वस्थता पसरली. त्यातच लाटकर माघार घेणार नसतील तर आम्हीच माघार घेऊ, अशी भूमिका खासदार शाहू छत्रपती यांनी घेतली. त्यामुळे आमदार सतेज पाटील व प्रमुख कार्यकर्त्यांची मोठी घालमेल सुरू झाली.दुपारी २ वाजून ५० मिनिटानंतर अतिशय वेगवान घडामोडी घडल्या. लाटकर काही आलेच नाहीत, मात्र मधुरिमाराजे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्या. त्या थेट निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात गेल्या, तेथून पुन्हा शेजारच्या खोलीत जाऊन बसल्या. त्याचवेळी काही तरी अघटित घडत असल्याची जाणीव झाली. त्याचवेळी शाहू छत्रपती यांची कार वेगाने जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. गाडीतून उतरताच ‘कुठाहेत मोदी, काय झालं, हीच का तुमची लोकशाही. काय झालं लाटकर यांच्या माघारीचे’ अशा शब्दात शिवसेना शहर प्रमुख सुनील मोदी यांना शाहू छत्रपती यांनी निवडणूक कार्यालयासमोर झाडले. मालोजीराजे कुठायंत, आत्ता येथे आले होते ना..? अशा शब्दात शाहू छत्रपती मालोजीराजे यांच्यावरदेखील भडकले.
वादावादीनंतर माघार..आमदार पाटील, मालोजीराजे छत्रपती यांचीही वाहने वेगाने तेथे आली. चौघांनी एक खोलीत तीन चार मिनिटे चर्चा झाली. त्या खोलीतून मालोजीराजे यांनी दंडाला धरून मधुरिमांना बाहेर काढले आणि माघार घेण्यास सांगितले. त्यानंतर मधुरिमा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गेल्या आणि त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांनाही बातमी कळताच सर्वांना धक्का बसला. या दहा मिनिटांच्या वेळेत काँग्रेस नेत्यांमध्ये बरीच ताणाताणी झाली. मधुरिमांच्या अनपेक्षित माघारीमुळे काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार कोल्हापूर उत्तरमध्ये असणार नाही.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघात गेल्या सात दिवसांत काय घडले२० ऑक्टोबर : काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती, सात जणांनी दिली मुलाखत२७ ऑक्टोबर : राजेश लाटकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर२८ ऑक्टोबर : काँग्रेस कार्यकर्त्यांकडून २७ ऑक्टोबरला पक्ष कार्यालयावर दगडफेक२८ ऑक्टोबर : उमेदवारी बदलण्याची काँग्रेसच्या २७ नगरसेवकांची मागणी२८ ऑक्टोबर : काँग्रेसने उमेदवार बदलला, मधुरिमाराजे यांना उमेदवारी जाहीर२९ ऑक्टोबर : राजेश लाटकर यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज२९ ऑक्टोबर : मधुरिमाराजे यांनी काँग्रेसकडून भरला अर्ज३१ ऑक्टोबर : काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव यांचा शिंदेसेनेत प्रवेश३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर : लाटकर यांचा अर्ज माघारी घेण्यासाठी वरिष्ठांकडून प्रयत्न२ नोव्हेंबर : खासदार शाहू छत्रपती, मालोजीराजे, उमेदवार मधुरिमाराजे यांनी लाटकर यांच्या घरी दिली भेट. माघार घेण्याची विनंती४ नोव्हेंबर : लाटकर यांचा अर्ज कायम, काँग्रेसच्या मधुरिमाराजे यांनीच घेतला अर्ज माघारी