कोल्हापूर : विधानसभेच्या मतदानासाठी अवघे सहा दिवस राहिले असताना आता नेतेमंडळींची ‘राखीव फौज’ कामाला लागली आहे. एकीकडे एकगठ्ठा मतदान देण्याची पात्रता असलेल्यांना हेरून फोडणारी आणि अंतर्गत जोडण्या घालणारी अशी यंत्रणा सक्रिय झाली आहे. सभा, मेळावे, पदयात्रा सुरूच राहणार असल्या तरी प्रत्यक्षात मतदानावेळी चमत्कार घडवणाऱ्या या जाेडण्यांसाठीची निवडणूक तंत्रामध्ये ‘तरबेज’ माणसं ही आता आपली करामत सिद्ध करण्यास सज्ज झाली आहेत.निवडणुकीचा प्रचार आता मध्यावर आला आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान असल्याने १८ नोव्हेंबर रोजी सोमवारी संध्याकाळी पाच वाजता जाहीर प्रचार थांबणार आहे. परंतु त्याआधीच नेते मंडळी आणि उमेदवारांनाही आपण नेमके कुठे कमी पडतोय याचा अंदाज आलेला आहे. म्हणूनच अगदी १००/२०० मतदानाचा गठ्ठा ज्याच्याकडे आहे अशांकडे आता मोर्चा वळवण्यात आला आहे.एखाद्या गावातील एखाद्या गटप्रमुखाने जर एखाद्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर त्याच्यासोबत सर्वचजण जाऊ नयेत यासाठी त्याच्याच गटातील असंतुष्टाला सोबत घेण्याच्या क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. एखाद्या नेत्यामुळे दुखावलेल्यांची यादी तयार करून अशांच्याही ‘स्वाभिमानाला’ आव्हान दिले जात आहे.आपण कारकीर्दीत कोणाला कोणाला नोकऱ्या लावल्या, कोणाची काय काय कामे केली, कंत्राटे दिली याची आठवण करून देऊन यावेळी अजिबात इकडं तिकडं होता कामा नये असा दमच काही ठिकाणी दिला जात आहे. सभा, पदयात्रांच्या परवानग्या, पाम्प्लेट छपाई, मोटरसायकल रॅलीच्या जोडण्या, सहभोजने, मिसळ पे चर्चा, तरुण मंडळांना पाठबळ, मतदानादिवशी मतदान कक्षात पाठवायचे प्रतिनिधी, त्यांची छायाचित्रे, पासेस, प्रत्येक गावात मतदारांना केंद्रापर्यंत नेण्यासाठीची यंत्रणा, त्यासाठीची वाहने या सगळ्या जोडण्या करताना उमेदवार आणि त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची दमछाक होत आहे.
बाहेरून मतदानासाठी जोरनोकरी, व्यवसायानिमित्त मोठ्या प्रमाणावर मतदार पुण्या-मुंबईसह अन्य शहरात आहेत. अनेकांचे वास्तव्य तिकडे असले तरी मतदान मात्र गावाकडेच आहे. त्यामुळे त्यांनाही मतदानासाठी आणण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी बसेसचेही आरक्षण करण्यात आले आहे. याआधी बहुतांशी ग्रामीण उमेदवारांनी पुण्या, मुंबईत मतदारांसाठी मेळावे घेतले आहेत.