प्रकाश पाटील --कोपार्डे --महाराष्ट्राच्या शेजारील असणाऱ्या गुजरातमध्ये गणदेवी साखर कारखान्याकडून उसाला महाराष्ट्रातील साखर कारखान्यांंपेक्षा तब्बल ७०० ते ८०० रुपये जादा दर दिला जातो. त्याचप्रमाणे दुधालाही गुजरातमधील दुधसंघाकडून प्रतिलिटर महाराष्ट्रापेक्षा ४ ते ५ रुपये जादा दर दिला जात आहे, त्यामुळे साखर व दूध उद्योगांत अग्रेसर म्हणून समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात उत्पादकांवर अन्यायच होत असल्याचे समोर आले आहे.१९६० नंतर महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारीने मोठी झेप घेतली. यासाठी लागणारा कच्चा माल म्हणून येथील शेतकरी पिकाकडे वळला. या पिकामुळे जनावरांसाठी लागणारा हिरवा चारा सहज उपलब्ध झाला आहे. याचा परिणाम महाराष्ट्राने दूध उत्पादनातही मोठी भरारी घेतली आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी सहकारी दूध उत्पादक संघही मोठ्या प्रमाणात स्थापन करण्यात आले. गावपातळीवर गटागटाच्या सहकारी दूध संस्था मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आल्या. यातून दूध उत्पादकांचे हित किती साधले गेले व राजकारण्यांचे किती? हा संशोधनाचा विषय आहे. व्यवहारातील अनियमितता, विस्कळीत कारभार, फोफावलेला भ्रष्टाचार, राजकारण या सर्व गोष्टींमुळे बहुतांश दुधसंघ आर्थिकदृष्ट्या डबघाईला आले आहेत. अनेक दुधसंघांकडे असलेला मार्केटिंगचा अभाव, प्रक्रिया यंत्रणेची कमतरता, आदी गोष्टींमुळे पिछाडीवर पडले आहेत. अनेक दुधसंघ केवळ दूध संकलन व विक्री पुरतेच मर्यादित राहिले आहेत, अशा परिस्थितीत दूध उत्पादकांना खरेदीदर देणे दूरच राहिले. उलट उत्पादन खर्चही वसूल होणार नाही, एवढा कमी दर राज्यातील सर्वच संघ दूध उत्पादकांना देत आहेत. याला राज्य शासनाचे उदासीन धोरणही कारणीभूत आहे. गेले कित्येक दिवस गायीच्या दुधाचा शासकीय खरेदीदर जेमतेम २० रुपये होता. यापेक्षा कर्नाटक व गुजरातमध्ये तोे दोन ते चार रुपये जास्त होता. अलीकडेच राज्य शासनाने हा खरेदी दर दोन रुपये वाढवून २२ रुपये प्रतिलिटर केला आहे, तर म्हैशीचा दूध दर ३१ रुपयांपर्यंत आहे. यात थोडी भर घालून गोकुळने गायीच्या दुधाला २३ रुपये ६० पैसे आणि जळगाव दुधसंघाने २३ रुपये ४० पैसे खरेदीदर दिला आहे, तर म्हैस दूध खरेदी दर ३४ रुपये ३० पैसे प्रतिलिटर आहे. दुसरीकडे गुजरातमध्ये दूध उत्पादकांना गायीच्या ३.५ फॅट दुधाला सुमारे २७ रुपये ९० पैसे प्रतिलिटर, तर म्हैशीच्या ६.० फॅट दुधाला ३९ रुपये १० पैसे प्रतिलिटर पर्यंत समाधानकारक दर दिला जातो. गायीच्या महाराष्ट्रातील व गुजरातच्या दराची तुलना करता ४ रुपये ३० पैसे तर म्हैशीच्या दुधाला ४ रुपये ८० पैसे प्रतिलिटर गुजरातमध्ये जादा दूध दर मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ऊसदरातही गुजरात आघाडीवरगुजरातमधील गणदेवी साखर कारखान्यांना साखर उताऱ्यानुसार प्रतिटन ३३०० ते ३५०० रुपये दर देत आहे. हा कारखाना गुजरात व महाराष्ट्राच्या अगदी सीमेवर आहे. इथे महाराष्ट्र साखर उताऱ्यानुसार २२०० ते २६०० रुपये प्रतिटन दर दिला जात आहे. गुजरातचा ऊसदर महाराष्ट्रापेक्षा किमान ७०० ते ८०० रुपयांनी जादा आहे.दूधाळ जनावरांचे दर, वैरण, पशुखाद्य व आरोग्य यावर होणारा खर्चाचा आणि मिळणारा दूधदर याचा ताळमेळ बसत नाही. उत्पादन खर्चही यातून काढणे मुश्कील झाले असून, फॅटमध्ये ही मोठी तफावत दिसते. दूध उत्पादकांना मिळणारा दर दिवसेंदिवस न परवडणारा आहे. फक्त दहा दिवसाला बिल मिळाल्याने चलन चालते. यामुळेच हा व्यवसाय टिकून आहे.- सुभाष पाटील, कोपार्डे, दूध उत्पादक
दुधाच्या दरातही महाराष्ट्र पिछाडीवर
By admin | Published: July 29, 2016 12:48 AM