कोल्हापूर : महाराष्ट्रभर चाललेल्या मराठा आरक्षणासंबंधी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहा जिल्ह्यांतील सुमारे बारा हजार वकिलांनी सहभाग घेत पाठिंबा दर्शविला. मोर्चात वकील सहभागी झाल्याने गुरुवारी दिवसभर सहा जिल्ह्यांतील न्यायालयीन कामकाज ठप्प राहिले. वकील आणि पक्षकारांनी न्यायालयाकडे पाठ फिरविल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे तीन हजार ६०० खटल्यांचे काम ठप्प राहिले.
कोल्हापुरात भव्य मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सहा जिल्ह्यांतील वकिलांनी न्यायालयीन काम बंद ठेवून मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यासंबंधीचे पत्र कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या बार असोसिएशनला खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अॅड. प्रशांत चिटणीस यांनी दिले आहे. त्यानुसार गुरुवारी सहा जिल्ह्यांतील सुमारे बारा हजार वकील बंद व मोर्चामध्ये सहभागी झाले.
कोल्हापुरातून सुमारे २00 वकील ड्रेसकोडमध्ये सकाळी दहा वाजता दसरा चौकात एकत्र आले. मोर्चामध्ये सहभागी होऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत सर्व वकील आंदोलनस्थळी ठाण मांडून होते. इचलकरंजीमधील वकिलांनीही आंदोलनास पाठिंबा दर्शवित न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहिल्याने येथील ३०० खटल्यांचे काम ठप्प झाले.
आंदोलनामध्ये खंडपीठ कृ ती समितीचे निमंत्रक व जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रशांत चिटणीस, ज्येष्ठ वकील शिवाजीराव राणे, अजिम मोहिते, महादेव आडगुळे, विवेक घाटगे, प्रकाश मोरे, रणजित गावडे, इंदिरा राजेपांढरे, प्रताप जाधव, आनंदराव जाधव, विलासराव दळवी, चंद्रकांत मोरे, प्रिया कुंडले, पूजा कटके, दिप्ती घाटगे, सरिता भोसले, आदींसह वकील सहभागी झाले होते.न्यायसंकुल परिसरात शुकशुकाटकसबा बावडा येथील न्यायसंकुल परिसरात वकील, पक्षकार, पोलीस यांची नेहमी वर्दळ असते. गुरुवारच्या बंदमध्ये वकिलांनी सहभाग घेऊन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतल्याने न्यायालयीन कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त एकही वकील, पक्षकार किंवा पोलीस न्याय संकुलाकडे दिवसभर फिरकलेच नाहीत. त्यामुळे याठिकाणी दिवसभर शुकशुकाट होता.