कोल्हापूर : जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. राज्य शासनाने कॅबिनेटमध्ये जाहीर केलेल्या नऊ गोष्टींची पुर्तता कशी व कधी करणार हे समाजाला ९ ऑक्टोबर पर्यंत पटवून सांगावे, अन्यथा १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय राज्यस्तरीय गोलमेज परिषदेत घेण्यात आला. यापुढे आरक्षणाची लढाई ही एक मराठा लाख मराठा या बॅनर खालीच लढण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी कोल्हापूरात राज्यस्तरीय गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी मराठा संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील होते.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून परिषदेची सुरूवात करण्यात आली. भरत पाटील यांनी स्वागत केले, पुंडलिक जाधव यांनी प्रास्ताविक केले. संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील म्हणाले, परिषदेत केलेले ठराव मुख्यमंत्री, राज्यपालांसह सर्व राज्यकर्त्यांना पाठवले जाणार आहेत. आम्हाला चर्चेला बोलावू नका, मात्र या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्या. जो पर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत लढाई कायम राहणार आहे.
गोलमेज परिषद होते म्हटल्यावर मंगळवारीच राज्य शासनाने मराठा समाजासाठी विविध योजनांची घोषणा केली. आंदोलनात मृत्यमुखी पडलेल्यांच्या कुटूंबांना नोकरी, आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे, आण्णासाहेब पाटील महामंडळास आर्थिक तरतुद आदी घोषणा यापुर्वीही शासनाने केल्या मात्र त्याची पुर्तता केली नाही. आता आम्ही अल्टीमेटम देतो, ९ ऑक्टोबरपर्यंत कॅबिनेटने घोषणा केलेल्या गोष्टींची समाधानकारक पुर्तता केली नाहीतर १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद केला जाईल.घोषणांनी परिसर दणाणलापरिषदेच्या सुरूवातीपासूनच विविध संघटनांचे पदाधिकारी घोषणा देत होते. एक मराठा लाख मराठा, तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवाजी, आरक्षण आमचं हक्काचे आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.या झाल्या मागण्या :
- यंदाच्या शैक्षिणक वर्षातील फीचा परतावा द्यावा.
- आण्णासाहेब पाटील महामंडळाकडून केवळ मराठा समाजालाच लाभ द्यावा.
- पदवीधर मधून मराठा क्रांती मोर्चाचा उमेदवार उभा करावा.
- महिलांसाठी विशेष न्यायालयाची स्थापना करावी.
- आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणतीही नोकर भरती नको.