कोल्हापूर : सकल मराठा समाजाने गुरुवारी पुकारलेल्या बंदमुळे बाजारपेठा व भाजीपाला मार्केट पूर्णत: बंद राहिले. दिवसभर भाजी खरेदीसाठी गजबजणाऱ्या बाजारपेठांमध्ये पोत्यांनी बांधून ठेवलेल्या भाज्यांच्या पाट्याच सर्वत्र दिसत होत्या. येथील शाहू मार्केट यार्डातही एकाही ट्रकची आवक झाली नाही. त्यामुळे दिवसभरात दीड कोटीची उलाढाल ठप्प झाली.कोल्हापुरात कपिलतीर्थ, पाडळकर मार्केट, लक्ष्मीपुरी धान्य बाजार, राजारामपुरी, आदी ठिकाणी भाजी मंडई आहेत. तिथे सकाळच्या टप्प्यात लोकांची भाजीपाला खरेदीसाठी मोठी गर्दी उसळते; परंतु गुरुवारी दिवसभर मंडईत कुणीही फिरकले नाही.
बंद आधीच माहीत असल्याने व्यापाऱ्यांनीही भाजीपाला बांधून ठेवून घरीच राहणे पसंत केले. शाहू मार्केट यार्डातही असेच चित्र राहिले. मार्केट यार्डाचा परिसर तर भल्या पहाटे जागा होतो. तिथे रोज सकाळी २५० ते ३०० ट्रक भाजीपाला व फळांची आवक होते.
भाजीपाला कर्नाटकातील घटप्रभा परिसरातून व शिरोळ तालुक्यातून आवक होतो. फळे मात्र पुणे व दिल्ली मार्केटमधून येतात. रोज कांदा व बटाट्याची ५५ ते ६० ट्रकची आवक होते. कांदा हा नीरा, लोणंद, दौंड, नाशिक या भागातून येतो. बटाटा मुख्यत: इंदूर व आग्रामधून येतो. बंदमुळे एकही ट्रक माल बाजार समितीत आला नसल्याचे समितीचे सचिव मोहन सालपे यांनी सांगितले.