Maharashtra Budget 2024: कोल्हापूर कन्व्हेन्शन सेंटरला ५० कोटी; अंबाबाई तीर्थक्षेत्र, शाहू स्मारकाला ठेंगा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 12:11 PM2024-06-29T12:11:41+5:302024-06-29T12:12:25+5:30

अंबाबाई आराखडा मागवला; पण अपेक्षाभंग

Maharashtra Budget 2024: 50 crores to Kolhapur Convention Centre; There is no provision for Ambabai, Shahu Memorial | Maharashtra Budget 2024: कोल्हापूर कन्व्हेन्शन सेंटरला ५० कोटी; अंबाबाई तीर्थक्षेत्र, शाहू स्मारकाला ठेंगा

Maharashtra Budget 2024: कोल्हापूर कन्व्हेन्शन सेंटरला ५० कोटी; अंबाबाई तीर्थक्षेत्र, शाहू स्मारकाला ठेंगा

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या शुक्रवारी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पाकडून कोल्हापूरच्या मोठ्या अपेक्षा होत्या; परंतु कन्व्हेन्शन सेंटरसाठी ५० कोटींची तरतूद वगळता काहीच पदरात पडलेले नाही. छत्रपती शाहू महाराजांच्या दीडशेव्या जयंतीचे औचित्य साधून शाहू मिलच्या ठिकाणी स्मारक उभारण्यासाठी शासन काही तरी ठोस कृती कार्यक्रम आणि निधी जाहीर करेल, अशी सर्व शाहूप्रेमींची अपेक्षा होती; परंतु त्यालाही ठेंगा दाखवण्यात आला असून, अंबाबाई मंदिरासाठीही कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही.

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शिवाजी विद्यापीठासमोरील राजाराम तलावाच्या परिसरात २५० कोटी रुपयांचे कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याचा संकल्प केला होता. त्याचा पाठपुरावा केल्यानंतर या अर्थसंकल्पात यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी या सेंटरचा उल्लेखही त्यांच्या भाषणात केला.

कोल्हापूर येथील तंत्रशिक्षण संस्थेत ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापण्याचीही घोषणा यावेळी करण्यात आली आहे. येथील धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयासाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे. कोल्हापूर, सांगलीच्या पूरनिर्मूलनासाठी जागतिक बॅंकेच्या सहकार्याने ३२०० कोटी रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याचाही उल्लेख यावेळी करण्यात आला. याच पद्धतीने सिंचन प्रकल्पांसाठी १५ हजार कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मिळणार असून, यातून अनेक वर्षे रखडलेल्या धामणी सिंचन प्रकल्पाला निधी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

राजर्षी शाहू महाराजांची १५० वी जयंती नुकतीच झाली. शाहू मिलच्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्मारक करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. याला १२ वर्षे झाली तरीही किमान या अर्थसंकल्पात तरी याबाबत काही तरी घोषणा होईल, अशी अपेक्षा होईल; परंतु याबाबतही अपेक्षाभंग झाला आहे.

अंबाबाई आराखडा मागवला; पण अपेक्षाभंग

अंबाबाई विकास आराखडा १४०० कोटी रुपयांचा आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी हा आराखडा तातडीने मागवून घेतला होता. यासाठी जिल्हा प्रशासनाने रात्रीचा दिवस करून हा प्रस्ताव तयार करून पाठवला होता. त्यामुळे यासाठी निधी मिळेल, अशी ठेवण्यात आलेली अपेक्षाही फोल ठरली आहे.

असे असेल कन्व्हेन्शन सेंटर

हजारो सभासदांकरिता बैठक व्यवस्था, अत्याधुनिक ऑनलाइन कॉन्फरन्स सुविधा, वाचनालय, आर्ट गॅलरी, जलतरण तलाव, उपहारगृह, प्रदर्शन हॉल याठिकाणी नियोजित आहे. २ लाख १३ हजार स्क्वेअर मीटरच्या भूखंडावर हे सेंटर उभारणार असून त्याचा बिल्टअप एरिया १ लाख ३३ हजार स्क्वेअर फूट आहे. विविध बैठका, परिषदा घेण्यासाठी सुयोग्य जागा नसल्याने क्षीरसागर यांनी हा प्रस्ताव मांडला होता.


कोल्हापूर जिल्ह्याचा झपाट्याने विस्तार होत असून, औद्योगिक, व्यापार, बांधकाम, कृषी या क्षेत्रातील सुरू असणारी घोडदौड त्यानुषंगाने सामाजिक, वैचारिक, राजकीय, सांस्कृतिक अभिसरण या सर्वांचा विचार करता विविध संघटनांच्या सामूहिक बैठका, विचारांचे अदान-प्रदान, सांस्कृतिक देवाण-घेवाण याकरिता एखादा जाहीर कार्यक्रम, बैठक, पत्रकार परिषद आयोजित करण्यासाठी शासनाचे अधिकृत कोणतेही केंद्र जिल्ह्यात उपलब्ध नाही. यासाठी ही संकल्पना मी मांडली होती. त्याला मंजुरी मिळाली असून निधीची तरतूद झाल्यामुळे लवकरच हे काम सुरू करण्यात येणार आहे. - राजेश क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

Web Title: Maharashtra Budget 2024: 50 crores to Kolhapur Convention Centre; There is no provision for Ambabai, Shahu Memorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.