कोल्हापूर - महाराष्ट्राची दिवाळी सुखाने साजरी करायची असेल तर भाजपा-शिवसेनेचं दिवाळं वाजल्याशिवाय महाराष्ट्राची दिवाळी साजरी होणार नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. कोल्हापूर दक्षिणचे आघाडीचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, जाहिराती बघून तेल, साबण निवडायचे असतात सरकार नाही. लोकशाहीत प्रत्येक स्वतंत्र्य आहे, टीका करताना विचारांवर झाली पाहिजे भूमिकेवर झाली पाहिजे, छातीवर कमळाचं चित्र असलेला टी शर्ट घालून ३५ वर्ष शेतकऱ्याने आत्महत्या केली. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा, तरुणांचा, महिलांचा विश्वास नसेल तर कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? असा सवाल त्यांनी सरकारला केला. मुख्यमंत्र्यांच्या सभेत कर्जमाफीवर प्रश्न केला त्यावर मुख्यमंत्री म्हणतात प्रत्येक सभेत असे 2-4 नमुने येतात. मुख्यमंत्रीसाहेब, ते नमुने नव्हते तर तो हाडामासाचा माणूस होता, ज्याच्या डोळ्यासमोर त्यांचं भवितव्य होतं, पोराबाळांची काळजी होती म्हणून तो तुम्हाला प्रश्न विचारला त्यावर तुमचं उत्तर भारत माता की जय असं सांगत अमोल कोल्हे यांनी सरकारवर प्रहार केला.
तसेच पैलवान दिसत नाही मग पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आखाडा खणायला येतात का? ही वाट परिवर्तनाची वाट आहे. राज्यभरात फिरत असताना संपूर्ण वातावरण फिरलंय. तरुणांचा झंझावत आला आहे. पंतप्रधानांपासून सगळे महाराष्ट्रात यायला लागलेत असा विश्वास अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, गेल्या ५ वर्षात महाराष्ट्राचे प्रश्न सोडविण्यात आलेलं अपयश लपविण्यासाठी कलम ३७० पुढे करताय. कलम ३७० हा जम्मू काश्मीर आणि लडाखमधील विषय आहे. महाराष्ट्राचे मुद्दे मांडा, कोल्हापुराच्या महापुरामध्ये सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडलं आज तु्म्ही त्यांना थारा देऊ नका, देशाचे विषय राज्यातील निवडणुकीत चालत नाही. बापाचं कतृत्व बघून पोरगी पोरगी देतात का? अशा शब्दात डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडविली आहे.