कोल्हापूर : लोकशाहीत विरोधी पक्ष महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील निवडणूक महत्त्वाची असताना काँग्रेस पक्ष पळ काढत आहे. राहुल गांधी हे मैदान सोडून बाहेर गेले आहेत. त्यांनी उमेदवारांच्या पाठीशी ठाम उभे राहणे गरजेचे होते. त्यांनी आत्ताच पराभव मान्य केला आहे, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी येथे केली.जत (जि. सांगली) येथील सभेला जाण्यासाठी कोल्हापूर विमानतळावर सकाळी सव्वा अकराच्या सुमारास गृहमंत्री शहा आले. त्यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करताना त्यांनी कोल्हापूरमधील मतदारसंघांचा आढावा घेतला. त्यानंतर गृहमंत्री शहा म्हणाले, आम्ही त्रिपुरामध्ये मंडई आणि रस्त्यावर उभे राहून भाजपचे २५० सदस्य बनवले. त्यानंतर एक हजार लोकांची सभा घेतली.
त्रिपुरात सध्या भाजप सत्तेत आहे. महाराष्ट्रात महायुतीचे २२० हून अधिक उमेदवार निवडून येतील. दरम्यान, गृहमंत्री शहा यांचे विमानतळावर आगमन होताच भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी पुष्पगुच्छ त्यांचे स्वागत केले.
यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, भाजपा प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर, प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, भाजपा सरचिटणीस विजय जाधव, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, आदी उपस्थित होते.कोल्हापूरमध्ये सभा घेण्याचा प्रयत्न करुराज्यात अनेक ठिकाणी या आठवड्यात सभांचे नियोजन असल्याने कोल्हापूरसाठी वेळ मिळणे अवघड आहे. शेवटच्या दोन दिवसात शक्य झाल्यास कोल्हापूरमध्ये सभा घेण्याचा प्रयत्न करु असे मंत्री शहा यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना सांगितले. पदाधिकाऱ्यांसमवेत संवाद साधल्यानंतर खासगी हेलिकॉप्टरने जतच्या दिशेने ते निघून गेले. शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळ परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता.ज्यादा जागा मिळायला हव्या होत्याजिल्ह्यातील बंडखोर उमेदवार आणि ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवित आहेत ते गृहमंत्री शहा यांनी जाणून घेतले. कोल्हापुरात कॉँग्रेसकडून अद्याप मोठी प्रचार सभा झाली नसल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी देताच शहा यांनी काँग्रेसवर टीका केली.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर जिल्हा पिंजून काढत असल्याचे राहूल चिकोडे यांनी सांगितले. भाजपला कोल्हापूर जिल्ह्यात ज्यादा जागा मिळायला हव्या होत्या, अशी अपेक्षा महेश जाधव यांनी व्यक्त केली. आई अंबाबाईचा आशीर्वाद घेण्यासाठी पुन्हा कोल्हापूर मध्ये येण्याची विनंती जाधव यांनी केली.