कोल्हापूर : आम्ही साधे-भोळे आहोत, असे कोणाला वाटत असेल तर त्यांनी लक्षात ठेवावे की भलेभलेही आम्हांला घाबरतात. अजूनही वेळ गेलेली नाही. शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी यांनी युतीधर्म पाळावा आणि कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजप उमेदवार अमल महाडिक यांचा प्रचार करावा, अन्यथा आमचे दरवाजे कायमचे बंद होतील, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिला. मंडलिकांनी सोईचे राजकारण संपवावे; कारण शिवसेनेला कोल्हापूर जिल्ह्यात आठ जागा जिंकायच्या आहेत, याची आठवणही पाटील यांनी करून दिली. एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही, हे लक्षात असू द्या असा दमच त्यांनी दिला.कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते, महापालिकेतील ताराराणी आघाडी, भाजप नगरसेवक यांचा मेळावा शुक्रवारी लोणार वसाहतीतील एक हॉलमध्ये पार पडला, त्यावेळी पाटील यांनी मंडलिक यांच्यासह शिवसेनेला इशारा दिला.चंद्रकांत पाटील म्हणाले, लोकसभेवेळी ‘आमचं ठरलंय’वाल्यांची मला मदत झाली, असे मंडलिक म्हणतात. मग भाजपने काहीच केले नाही का? तुम्हाला आमची अंधारात, उजेडात जी मदत झालीय, त्याची जरा जरी जाणीव असेल तर युतीधर्म पाळा. भाजप उमेदवाराशी एकनिष्ठ राहा. कार्यकर्त्यांचे रोष पत्करून तुम्हाला आम्ही मदत केली आणि आता तुम्ही आमच्या पाठीत खंजीर कसे खुपसता? जर तुम्ही भूमिका बदलली नाही तर आमचे दरवाजे कायमचे बंद होतील. कोणतेही काम घेऊन भाजपच्या दारात पुन्हा येऊ नका.सोईचे खोटे राजकारण करणारे संपणार आहेत, अडगळीत पडणार आहेत, याची जाणीव झाली म्हणूनच कॉँग्रेस नेत्यांची तरुण मंडळी पटापट बाहेर पडून भाजपमध्ये येत आहेत. यासाठीच मंडलिकांनी खोटे राजकारण सोडून प्रामाणिकपणे काम करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.पाताळयंत्री लोकांशी लढत‘कोल्हापूर उत्तर’मधून पडायला कोणी तयार नाहीत म्हणून चंद्रकांत जाधव यांना कॉँग्रेसने उमेदवारी दिली. ‘दक्षिण’मध्ये सतेज पाटील पडणार असे लक्षात येताच कोणाचा बळी द्यायचा, तर पुतण्याचा म्हणून त्यांना उमेदवारी दिली. सतेज पाटील यांनी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवली आहे. बार उडाला तर उडाला; अन्यथा पळून जायला मोकळा, असे सांगतानाच पाताळयंत्री माणसांबरोबर आपली लढाई आहे, तेव्हा कार्यकर्त्यांनी सावध राहावे, असे आवाहन पाटील यांनी केले.
Maharashtra Election 2019 : सोईचे राजकारण थांबवा, अन्यथा दरवाजे बंद - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 5:35 AM