लोकमत न्यूज नेटवर्क- सुरज पाटीलहेरले : कोल्हापूर -सांगली महामार्गावर हेरले येथील देसाई मळ्याजवल पुराचे पाणी आल्याने ६ वाजता रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला. हेरले येथील देसाई मळ्याजवळील घरामध्ये पुराचे पाणी आले आहे. महामार्गावर दुपारी ४:३० च्या दरम्यान पाणी येण्यास सुरुवात झाली. (Kolhapur-Sangali Highway closed due to flooded water.)
२००५ व २०१९ साली जेथून पाणी आले होते त्या ठिकाण्यावरूनच दुपारी ४:३० च्या दरम्यान सांगली वरून कोल्हापूर च्या दिशेने येणाऱ्या महामार्गावर पाणी येण्यास सुरुवात झाली आहे.पाणी पातळी वाढत असून २००५ व २०१९ पेक्षा पाण्याचा जोर जास्त आहे.
हेरले जवळील देसाई मळयानजीक रस्त्यावर ओढ्यातील पुराचे पाणी वाढून ते रस्त्यावर तीन फुटापर्यत आल्याने रस्त्यावरील सर्व वाहतूक ६ च्या बंद करण्यात आली आहे. हेरले परिसरातील कामगार, नोकर, मजुर , टेक्निशयन यांना कामावरून घरी येण्यासाठी लगबग सुरू आहे. पुराचे पाणी येथ आल्याने परिसरातील लोक पाणी पाहण्यासाठी रस्त्यावर गर्दी करीत आहेत. तीन फुट खोल पाण्याची पातळी आहे. पावसाचा जोर कायम असल्याने पाणी वाढण्याची शक्यता आहे. या पाण्यात तरूणाईची हुल्लडबाजी सुरु आहे .कोरोना मुळे शाळांना सुट्टी असल्याने मुलांची पाणी पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. या दंगा मस्तीमध्ये पाण्यामध्ये वाहून जाण्याची अथवा बुडण्याची शक्यतः असल्याने हातकणंगले पोलीसांनी येथे चोख बंदोबस्त ठेवला आहे.