प्रवीण देसाई
कोल्हापूर - पुरामुळे रोहित्र, खांब, वीजमीटर तसेच अनेक तांत्रिक साहित्य नादुरुस्त झाले आहेत. ते बदलण्यासाठी शनिवारपासून राज्यभरातून साहित्य घेऊन 50 ट्रक कोल्हापूर-सांगलीकडे निघाले आहेत. यातील 7 ट्रक शिरोली येथे दाखल झाले असून पुणे-बंगळुरू महामार्गावर अजूनही जवळपास चार फूट पाणी असल्याने ते तिथे थांबले आहेत. पाणी ओसल्यावर ते कोल्हापूरमध्ये येतील.
महावितरणचे राज्यभरातील हजारो हात कोल्हापूर व सांगलीचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी मदतीला धावून आहेत. पुणे, सातारा, सोलापूर, कल्याण, औरंगाबाद, परभणी यासह राज्यभरातून नवीन रोहित्र, खांब, मीटर आदी सहित्याचे जवळपास 50 ट्रक कोल्हापूर, सांगलीकडे येत आहेत. यामध्ये 100 किलोव्हॅटची 46 रोहित्रे, 5000 थ्री फ़ेज मीटर यांचा समावेश आहे. तसेच वीजवाहिन्यांसाठी लागणारे रिले बोटीच्या साह्याने कोल्हापुरात पोहोचले देखील आहेत. सर्व साहित्य पूर ओसरण्यापूर्वीच पोहचविण्यासाठी महावितरण प्रशासनाने वरिष्ठ पातळीवर काटेकोर नियोजन केले आहे.
महापुरामुळे दोन जिल्ह्यातील 3 लाखांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खबरदारीपोटी खंडित करावा लागला होता. शनिवारपासून पाणीपातळी संथ गतीने कमी होत आहे. तसा खंडित झालेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या कामानेही वेग घेतला आहे. कोल्हापूर शहरातील विक्रमनगर भागातील 10 रोहित्र व त्यावरील 1 हजार ग्राहक, शुक्रवार गेट वाहिनीवरील 5 हजार व लक्ष्मीपुरी भागातील 1 हजार 400 अशा 36 रोहित्र व त्यावरील 7 हजार 400 ग्राहकांचा वीजपुरवठा आज सुरळीत करण्यास महावितरण शहर विभागाला यश आले.
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात 38 हजार व आतापर्यंत 94 हजार 353 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केला आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण युद्धपातळीवर प्रयत्न करत असून शनिवारी दिवसभरात दोन जिल्ह्यातील मिळून 44 हजार 773 तर आतापर्यंत तीन दिवसांत 1 लाख 11 हजार 467 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केल्याची माहिती महावितरणने दिली आहे.
ग्रीन कॉरिडॉर करणा
ग्रीन कॉरिडॉर द्वारे साहित्य शहरात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. वीज ही अत्यावश्यक बाब असल्याने वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून शिरोली येथे थांबलेले ट्रक पाणी ओसरल्यावर ग्रीन कॉरिडॉरद्वारे शहरात आणण्याचा महावितरणचा प्रयत्न आहे.