कोल्हापूर : महाराष्ट्राने सदैव देशाचे ज्ञाननेतृत्व केले आहे. देशाच्या सत्तेचा मार्ग हा उत्तरेतून जातो, असे म्हटले जाते. मात्र, देशाच्या ज्ञानाचा महामार्ग हा आजही महाराष्ट्रातूनच जातो, असे प्रतिपादन ज्येष्ठ राजकीय विचारवंत डॉ. प्रकाश पवार यांनी शनिवारी येथे केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या ‘शिव वार्ता’ या यूट्यूब वाहिनीला ‘महाराष्ट्राच्या भवितव्याची दिशा’ या विषयावरील विशेष मुलाखतीत ते बोलत होते. जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी ही मुलाखत घेतली.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना कार्य करण्याचे, त्यांचे निर्णय त्यांच्या पातळीवर घेण्याचे स्वातंत्र्य प्रदान करण्याची गरज आहे. बळवंतराय मेहता, वसंतराव नाईक आदींच्या प्रयत्नांमुळे सन १९६२ ते १९७० च्या कालखंडात केंद्र, राज्य, प्रांत ही राजकारणाची केंद्रे होती, तर स्थानिक स्वराज्य संस्था या जिल्हा, तालुका, गावपातळीवरील निर्णय घेणाऱ्या व्यवस्था होत्या. सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे आमच्या गावात, आमचेच सरकार ही भावना सर्वदूर दृढमूल झाली होती. मात्र, काळाच्या ओघात या संस्था निधी वाटप करणाऱ्या मध्यस्थ यंत्रणा बनून राहिल्या आहेत. त्यातून त्यांना बाहेर काढून पुनश्च स्वतंत्रपणे काम करण्याची, निर्णय घेण्याची संधी मिळावी, ही महाराष्ट्राच्या ६१ व्या वर्धापन दिनाची मागणी आहे. ती पूर्ण करण्याची गरज आहे. महाराष्ट्र विविध क्षेत्रांत प्रगतिपथावर असला तरी संसाधनांच्या उपलब्धतेसह अनेक विषमताही येथे आहेत. त्यामुळे निर्माण होणारी सामाजिक विषमतेची दरी सांधली, तर या प्रगतीची दिशा अधिक उज्ज्वल असणार आहे. त्या दिशेने घेऊन जाणाऱ्या नेतृत्वाची महाराष्ट्राला खरी गरज असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.
चौकट
महाराष्ट्राचा पॅॅटर्न स्वीकारण्याची गरज
कोरोनाच्या काळातला लॉकडाऊनचा पॅटर्न महाराष्ट्राने देशाला दिला. तो केंद्राने व्यापक हिताच्या दृष्टिकोनातून निरपेक्ष भावनेने स्वीकारण्याची गरज आहे.
फोटो (०२०५२०२१-कोल-प्रकाश पवार (विद्यापीठ)