गडहिंग्लज : खोटी जाहीरातबाजी करून सत्तेवर आलेल्या युतीने जनतेचा विश्वासघात केला आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव, रोजगार निर्मिती व महिलांचे संरक्षण आदी सर्वच आघाड्यांवर भाजपा सरकार अयशस्वी ठरले आहे. म्हणूनच ‘वातावरण फिरलयं..महाराष्ट्राच ठरलयं’ आता बदल नक्कीच आहे, असा विश्वास खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज व्यक्त केला.कागल विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. मुश्रीफांसारख्या कर्तृत्ववान माणसाला मत देण्याच भाग्य गडहिंग्लजकरांना मिळाल्यामुळे त्यांच्यावरील अलोट प्रेमाची साक्ष देणारी गडहिंग्लजची सभा म्हणजे त्यांची विजयी सभाच आहे, असा दावाही त्यांनी केला. अध्यक्षस्थानी माजी आमदार श्रीपतराव शिंदे होते.कोल्हे म्हणाले, राज्य बँकेतील २५ हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप बिनबुडाचा आहे. सर्वसामान्य जनतेच्या जगण्याचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरल्यामुळेच राज्याच्या निवडणुकीत देशाच्या प्रश्नांवर आणि भावनिक मुद्यांवर मते मागण्याची वेळ महायुतीच्या नेत्यांवर आली आहे.आमदार संध्यादेवी कुपेकर म्हणाल्या, मुश्रीफ स्वयंप्रकाशित नेते आहेत. त्यांच्या विजयाची चिंताच नाही. ज्याप्रमाणे स्व. कुपेकरांनी गडहिंग्लज व उत्तूरचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मुश्रीफांकडे सोपविला. त्याप्रमाणेच गडहिंग्लज व आजऱ्याचा बालेकिल्ला राजेश पाटील यांच्याकडे सोपवत आहे. त्यांनी चंदगडप्रमाणेच गडहिंग्लज, आजऱ्यालाही न्याय द्यावा.मुश्रीफ म्हणाले, आंबेओहोळ-नागनवाडी प्रकल्प मार्गी लावण्याबरोबरच गडहिंग्लजच्या एमआयडीसीतून रोजगार निर्मिती हाच माझा अजेंडा आहे. नेत्याशी व पक्षाशी एकनिष्ठ राहिलो म्हणून जनतेनेच ही निवडणूक हातात घेतल्यामुळे विजयाची काळजी नाही.चंदगडचे उमेदवार राजेश पाटील म्हणाले, चंदगडकरांनी संध्यादेवींना आपलं मानले, त्याप्रमाणे गडहिंग्लजकरांनी मला आपलं मानून संधी द्यावी.नगराध्यक्षा स्वाती कोरी म्हणाल्या, पुरोगामी विचारांच्या अस्तित्वाची लढाई म्हणूनच जनता दलाने मुश्रीफ यांना पाठिंबा दिला आहे. पुरोगामी गडहिंग्लजनगरीतून त्यांना किमान १५ हजार मते नक्कीच देवू.यावेळी किसनराव कुराडे व राजेंद्र गड्यान्नावर यांचीही भाषणे झाली. किरण कदम यांनी प्रास्ताविक केले. सुरेश दास यांनी सूत्रसंचलन केले. महेश सलवादे यांनी आभार मानले. गुन्हा कुणावर दाखल करायचा?आघाडीच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल बोलताना तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सरकारवर खूनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करित होते. त्यांच्या ५ वर्षाच्या कारकीर्दीत १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. परवा, ३५ वर्षाच्या तरूण शेतकऱ्याने बुलढाण्यात आत्महत्या केली. त्याच्या अंगातील टी शर्टवर ‘कमळा’च चिन्ह आणि पुन्हा आणूया ‘आपलं सरकार’ असे लिहिले होते. आता, खूनाचा गुन्हा कुणाविरूद्ध दाखल करायचा, असा सवालही कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. आखाडा खणायला आलेत का ?समोर कुणी पैलवानच नाहीत या मुख्यमंत्र्यांच्या विधानाची खिल्ली कोल्हेंनी उडवली. तोडीचे पैलवानच नसतील तर देशाचे नेते मोदी व शहा आखाडा खणायला आलेत का ? की गुरूजींनी बोलावल्यामुळे नापास झालेल्या पोराचे बाप जनतेला भेटायला आले आहेत, असा टोलाही लगावतानाच ५४ वर्षात २ लाख ८५ हजार कोटीचे कर्ज असणाऱ्या महाराष्ट्राच्या डोक्यावर महायुतीने अवघ्या ५ वर्षात २ लाख १५ हजार कोटी कर्ज करून ठेवले आहे, असा आरोपही कोल्हेंनी केला. कौटुंबिक वादामुळेच थांबलो..!पवारसाहेबांनी आपल्या कुटुंबाला भरभरून दिले, त्यांच्या ऋणातून उतराई होणे शक्यच नाही. कौटुंबिक वादामुळेच आपण व नंदाताईंनी निवडणुकीतून माघार घेतली. कांही प्रश्नांना उत्तरे नसतात, त्यांचा खुलासा करता येत नाही. कार्यकर्ते व जनतेचा अपेक्षाभंग झाला, त्याबद्दल मी सर्वांची क्षमा मागते, अशा शब्दांत आमदार कुपेकरांनी माघारीचा गौप्यस्फोट जाहीरपणे केला.