बेळगाव : रहेंगे तो महाराष्ट्र मे, नही तो जेल मे अशा घोषणाबाजीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह इतर नेत्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. घोषणाबाजीने जाहिर सभेचा सारा परिसर दणाणून गेला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला.चव्हाण यांच्यासह अमित देशमुख, सतेज पाटील हे नेते सध्या बेळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. हे नेते बेळगाव ग्रामीण आणि खानापूर तालुक्यात काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करणार आहेत.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात महाराष्ट्रातील नेत्यांनी प्रचार करू नये, यासाठी मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी काँग्रेस नेत्यांना भेटून तशी विनंती केली आहे. तरीही काँग्रेस नेते समितिविरोधी प्रचाराला बेळगाव आणि खानापुरात आले आहेत. त्यामुळे त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा इशारा मराठी भाषकांनी यापूर्वी दिला होता.कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे उभ्या राहिलेल्या बेळगाव ग्रामीणच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यास अशोक चव्हाण व इतर नेते बेळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. मात्र, समितीच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला शुक्रवारी या नेत्यांना सामोरे जावे लागले.शुक्रवारी सायंकाळी बेनकनहळळी येथे चव्हाण यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. चव्हाण यांनी वेशीवर असलेल्या शिवपुतळ्यास हार अर्पण केला. त्याचवेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत चव्हाण यांना काळे झेंडे दाखवत निषेध केला.यावेळी प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. समितीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून चव्हाण यांना निवेदन सादर केले. त्यावेळी सीमाप्रश्नाबद्दल आपण वक्तव्य करणार नसून काँग्रेसच्या प्रचारार्थ बेळगावला आलो असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. बेनकनहल्ली येथील माळावर त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.