कोल्हापूर: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावांवर दावा सांगितल्याने महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळला आहे. याचे संतप्त पडसाद सीमा भागातील मराठी भाषिकांसह महाराष्ट्रभर उमटू लागले आहेत.
कर्नाटक सरकारच्या याच दडपशाही विरोधात आणि बेळगांव, निपाणी, कारवार, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यामागणीसाठी आज, शनिवारी कोल्हापुरात महाविकास आघाडीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी हे आंदोलन होत आहे. दरम्यान, अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात १५ दिवसांसाठी बंदी आदेश जारी केला आहे.आंदोलनस्थळी माजी गृहराज्य मंत्री आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ, ऋतुराज पाटील, जयश्री जाधव, शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव तसेच सीमाभागातील नेते दाखल झाले आहेत. कर्नाटक सरकारच्या निषेधातील फलक घेवून आंदोलनस्थळी नागरिक दाखल झाले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.