बाबासो हळीज्वाळेकोगनोळी : गेल्या अनेक वर्षांपासून कर्नाटक सरकारकडून सीमा भागातील मराठी भाषिकांवर अन्याय केला जात आहे. कर्नाटक दिना दिवशी पाळण्यात येणारा काळा दिन तसेच बेळगाव मधील विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आयोजनात येत असलेला मराठी भाषकांचा महामेळावा पोलीस बळाचा वापर करून दडपून टाकण्यात आला. या सर्व गोष्टींच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीने आज चलो कोल्हापूरचा नारा दिला होता. बेळगावातून मोठ्या संख्येने मराठी बांधव कोल्हापूरकडे रवाना झाले. यावेळी कोगनोळी टोल नाक्यावर समितीच्या कार्यकर्त्यांचे कोल्हापुरातील सर्व पक्षांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किनेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, विकास कलघटगी, आबासाहेब दळवी, शिवानी पाटील, साधना पाटील, शुभम शेळके, सचिन गोरले, प्रकाश शिरोळकर, रमाकांत कोंडुसकर आदी कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार के. पी. पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, राष्ट्रवादीचे नविद मुश्रीफ, भैय्या माने यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.आपल्या मागण्या महाराष्ट्र सरकारसमोर मांडण्यासाठी तसेच कर्नाटक शासनाचा विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. कर्नाटक सरकार कशापद्धतीने मराठी भाषिकांवर अन्याय, अत्याचार करत आहे, लोकशाहीची कशापद्धतीने पायमल्ली करून दडपशाहीचे अस्त्र उगारत आहे, याची माहिती दिल्लीदरबारी पाठविण्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
Maharashtra Karnataka border dispute: महाराष्ट्र एकीकरण समितीचे महाराष्ट्रात जंगी स्वागत, दूधगंगा नदीपासून रॅली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 12:27 PM