कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे ६२ व्या वरिष्ठ राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा जालना येथे होत आहेत. यात ‘महाराष्ट्र केसरी’च्या मानाच्या गदेसाठी राज्यातील कुस्तीगीर जिवाचे रान करीत आहेत.
गेल्या सतरा वर्षांपासून ‘कुस्ती पंढरी’ समजल्या जाणाऱ्या कोल्हापूरला या मानाच्या गदेची प्रतीक्षा लागून राहिली आहे. यंदा तरी करवीरचा पठ्ठ्याने ही गदा मिळवून या नगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जावा, अशी अपेक्षा कुस्तीशौकिनांतून व्यक्त होत आहे.जालना येथील आझाद मैदानावर यंदा ही स्पर्धा १९ ते २३ डिसेंबरदरम्यान होत आहे. त्यात कोल्हापूर जिल्हा व शहर तालीम संघाचे असे दोन संघ मैदानात उतरणार आहेत. त्यामध्ये ५७, ६१, ६५, ७४, ७९, ८६ आणि ९७ व ‘महाराष्ट्र केसरी’साठी ८६ ते १२५ किलो असे वजनगट आहेत.
कोल्हापूरच्या संघातून मोतीबाग तालीमचा उदयराज पाटील, संतोष लव्हटे, महेश वरुटे, शिवाजी पाटील, न्यू मोतीबागचा मल्ल व उपमहाराष्ट्र केसरी नंदू आबदार, शाहू कुस्ती केंद्र (शिंगणापूर)चा संग्राम पाटील, गंगावेशचा सचिन जामदार, शिवाजी पाटील (कापशी), कौतुक डाफळे (काका पवार कुस्ती संकुल) या मल्लांवर भिस्त आहे. यातील चौघाजणांची मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी होणार आहे.हिंदकेसरी विनोद चौगुले यांनी २००० साली ‘महाराष्ट्र केसरी’चा किताब पटकाविल्यानंतर आजतागायत एकाही मल्लाने या गदेचा मान कोल्हापूरच्या कुस्ती पंढरीला अद्यापही मिळवून दिलेला नाही. त्यापूर्वी १९८५ साली विष्णू जोशीलकर यांनी गदा पटकाविली होती. त्यामुळे यंदा तरी ही गदा मिळवून या कुस्ती पंढरीची मान उंचावेल अशी कामगिरी या मल्लांकडून व्हावी, अशी अपेक्षा कुस्तीशौकिनांकडून व्यक्त होत आहे.
संपूर्ण राज्यातील तालीम संघांच्या निवडी जाहीर झाल्यानंतर यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे एकूणच चित्र स्पष्ट होईल.- चंद्रहार पाटील, डबल महाराष्ट्र केसरी