Kolhapur: नांदेडची खिडकी काढून नेली, पण कोल्हापुरची खिडकी शोभा वाढवेल - विजय वडेट्टीवार
By पोपट केशव पवार | Published: May 5, 2024 12:23 PM2024-05-05T12:23:55+5:302024-05-05T12:26:29+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: उलट कोल्हापुरातील शोभिवंत खिडकीमुळे आमच्या घराचे सौंदर्य अधिक वाढेल या शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण यांना टोला लगावला.
- पोपट पवार
कोल्हापूर - भाजपने राष्ट्रवादी, शिवसेनेची घरे फोडली.आमच्याही नांदेडसारख्या काही खिडक्या काढून नेल्या. पण,यामुळे आमचे घर उघडे पडले नाही. उलट कोल्हापुरातील शोभिवंत खिडकीमुळे आमच्या घराचे सौंदर्य अधिक वाढेल या शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण यांना टोला लगावला.
वडेट्टीवार म्हणाले, पंतप्रधान सर्व भ्रष्टाचारी लोकांना नवीन मंडप घालून आपल्या जवळ बसवून घेत आहेत. दुसऱ्यांची घरे फोडत आहेत. आमच्याही घराच्या खिडक्या काढून नेल्या जात आहेत. त्यांनी आमची नांदेडची खिडकी काढून नेली. पण, यामुळे आमचे घर उजाड होणार नाही. कोल्हापुरची खिडकी आमच्या घराची शोभा वाढवेल. सांगलीत विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाला. पण, आघाडी धर्मामुळे ती जागा शिवसेनेला दिली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे आमचे काम असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले.
शाहूंचा विचार संपवण्यासाठीच मुख्यमंत्री कोल्हापुरात
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री चार चार दिवस कोल्हापुरात मुक्काम करत आहेत. त्यांना शाहू महाराजांच्या विचारांची इतकी भीती का आहे. ते शाहू महाराजांचे विचार संपवण्यासाठीच चार चार दिवस कोल्हापुरात मुक्काम करत आहेत. मात्र, शाहूंचा विचार मारण्यासाठी चार काय ४० दिवस थांबले तरी येथील जनता शाहू विचारांनाच बळ देईल, असा दावा वडेट्टीवार यांनी केला.
राज्यात ३८ जागा जिंकू
राज्यात महाविकास आघाडीला चांगले वातावरण असून किमान ३८ जागा जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विदर्भातील दहाच्या दहा जागांवर आमचा विजय होईल. नितीन गडकरी यांचाही पराभव होईल असा दावा त्यांनी केला.