सांगली : राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंच्या पाठीवर सांगलीच्या क्रीडाधिकारी कार्यालयाने कौतुकाची थाप मारली. टुमकूर (कर्नाटक) येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील मुले व मुली या दोन्ही संघांनी करिश्मा केला. मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात अनुभवी केरळ राज्याला पराभूत करून सुवर्णपदक पटकावले. मुलींच्या संघाने कौशल्यपूर्ण खेळ करीत अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली. मात्र, अंतिम सामन्यात तगड्या कर्नाटकने महाराष्ट्राचा पराभव केला. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुलींच्या संघास रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या या दोन्ही विजेत्या संघांचे सांगलीच्या जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाने मिरज रेल्वे स्टेशनमध्ये ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषी स्वागत केले. जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनी विजेत्या खेळाडूंना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. उमेश बडवे यांनी स्वागत केले. यावेळी सुधाकर जमादार, शंकर भास्करे, दादासाहेब सावंत, दीपक सावंत, बापू समलेवाले, गजानन कदम, मंदाकिनी पवार, मारुती साठे, दत्ता कित्तुरे, अमित देसाई उपस्थित होते. हुतात्मा किसन अहिर विद्यालयाने या स्पर्धेचे नेटके संयोजन केले होते.
राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र नंबर वन
By admin | Published: January 06, 2016 12:05 AM