लोकमत न्यूज नेटवर्क,--सचिन भोसले
कोल्हापूर : भारतात आॅक्टोबरमध्ये होणाºया फिफा सतरा वर्षांखालील विश्वचषक फुटबॉॅल स्पर्धेनिमित्त राज्यात ८ सप्टेंबर २०१७ ला एकाच दिवशी राज्यातील तीस हजार शाळांमधून दहा लाख मुले-मुली फुटबॉल खेळणार आहेत. मिशन वन मिलियननिमित्त राज्यात फुटबॉल क्रांती रुजेल, असा विश्वास शालेय शिक्षण व क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला. या संदर्भात शनिवारी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
तावडे म्हणाले, आंतरराष्ट्रीय फुटबॉल फेडरेशन (फिफा)तर्फे भारतात आॅक्टोबरमध्ये १७ वर्षांखालील युवा विश्वचषक स्पर्धा होत आहे. त्यानिमित्त अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय होण्याबरोबरच महाराष्ट्र मिशन वन मिलियन साध्य करण्यात येणार आहे. यानिमित्त एकाच दिवशी राज्यातील ३० हजारांहून अधिक शाळांमध्ये सुमारे एक लाख फुटबॉलचे वाटप केले जात आहे. यासह शाळा, कॉलेज, विद्यापीठे यांमध्ये फुटबॉल स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.
याबरोबच जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर, कार्यशाळा व क्रीडा क्षेत्रातील करिअर याबाबत जागृती केली जाणार आहे. अखिल भारतीय फुटबॉल संघटनेच्या धर्तीवर जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय फुटबॉल प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. मुळातच फुटबॉल हा खेळ अत्यंत कमी पैशात खेळला जाणार आणि आरोग्य व शारीरिक तंदुरुस्ती ठेवणारा खेळ आहे. शाळांना संबंधित यंत्रणेकडून फुटबॉल आणि इतर साहित्य प्राप्त करून घेतल्यानंतर ३० हजार शाळांमध्ये फुटबॉल खेळला जाणार आहे.
फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण देशात क्रीडा संस्कृती रुजविण्याचे प्रयत्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहेत. यासाठी राष्ट्रीय स्तरावर मिशन अकरा मिलियन हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात मिशन वन मिलियन हा फुटबॉल प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या मिशनच्या निमित्ताने शाळांमधून जवळपास दहा लाखांहून अधिक मुला-मुलींपर्यंत फुटबॉल आणि क्रीडा संस्कृती पोहोचविण्यात येणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरत असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले.यावेळी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष विश्वजित कदम, मालोजीराजे छत्रपती, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, आदी उपस्थित होते.