कोल्हापूर : देशात २०१४ ला सत्तांतर झाले आणि दाढीवाले बाबा सत्तेवर आले. सर्वसामान्य जनतेला वाटलं आता महागाई कमी होईल, रोजगार मिळतील, महिलांवरील अत्याचार कमी होतील. पण उलटेच घडले. दाढीवाले बाबा आले आणि त्यांनी महागाई लादली. महिलांवर अत्याचार वाढले, लोकांचे रोजगार गेले, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.
बुधवारी रात्री लक्ष्मीपुरी येथे घेण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. केंद्रातील भाजप सरकार महिलांविरोधी असल्याचे सांगत सव्वालाखे म्हणाल्या की, महिलांवर सर्वाधिक अत्याचार उत्तरप्रदेशात होत आहेत. पण आमच्या विचित्रा (चित्रा) वाघ त्यावर बोलत नाहीत.
दाढीवाले बाबा बेटी बचाव, बेटी पढावचा नारा देतात, पण त्यांना महिलांवरील अत्याचार दूर करता आले नाहीत. साडेतीनशे रुपये गॅस सिलिंडर झाले, तेव्हा स्मृती इराणी डोक्यावर सिलिंडर घेऊन संसदेच्या दारात नाचल्या होत्या. आता एक हजारावर गॅस गेला, मग या इराणी बाई कोठे गेल्या?
यावेळी हर्षल सुर्वे, भारती पोवार, कल्याणी माणगावे यांचीही भाषणे झाली. सरलाताई पाटील, संध्या घोटणे, सुलोचना नाईकवडे, स्मिता गवळी, निलोफर आजरेकर, हरिदास सोनवणे, गशी आजरेकर, आश्पाक आजरेकर उपस्थित होते.
कोल्हापूरच्या संस्कृतीच पायमल्ली : मालोजीराजे
निवडणुकीच्या दरम्यान मतदारांना भीती घालणे, कार्यकर्त्यांना धमक्या देणे, पायताण हातात घेण्याची भाषा करणे असले प्रकार यापूर्वी कधीही कोल्हापुरात घडले नाहीत. पण या निवडणुकीत भाजपकडून असले प्रकार घडले. त्यांनी कोल्हापूरच्या संस्कृतीची पायमल्ली केल्याची टीका मालोजीराजे यांनी केली.
त्यावेळी तुमचे हिंदुत्व कोठे गेले? : क्षीरसागर
गणपती उत्सव आला की चंद्रकांत पाटील यांनी गणेशोत्सवात साऊंड सिस्टीम लावायचा नाही म्हणून अनेकांना पैसे दिले, मंडळांना पैसे वाटले. मग त्यावेळी तुमचे हिंदुत्व कोठे गेले होते? अशी विचारणा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली. जातीपातीचे राजकारण शिवसेना करीत नसून भाजप करीत असल्याचे आराेप त्यांनी केला.