कोल्हापूर – कोल्हापूर शहर व जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी तुफान पाऊस सुरू असून जिल्ह्यातील पंचगंगा नदीसह अन्य सर्व नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत. जिल्ह्यातील महापूराच्या परिस्थितीमुळे शेकडो कुटुंबांना जिल्हा आणि महापालिका प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले असून अद्यापही बचावकार्य सुरू आहे. वाहतूक तसेच नागरी जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून तासागणिक वाढणारा पाऊस आणि नद्यांची पातळी यामुळे प्रशासनाचे आणि नागरिकांचे धाबे दणाणले आहेत.
पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे हे नागरिकांच्या बचावकार्यात तसेच महापूराचे संकट थोपविण्याच्या कार्यात व्यस्त आहेत. कोल्हापूर शहरात पंचगंगा नदी ४३ फूट धोका पातळी ओलांडून सध्या ५० फूटांवरून वाहत आहे. त्यामुळे शहरातील महापुराची स्थिती अधिक गंभीर झाली आहे. शहरातील दुधाळी, उत्तेश्वरपेठ, शुक्रवारपेठ, सिध्दार्थनगर, रमणमळा, जाधववाडी, कदमवाडी, बापट कँम्प, शाहुपुरी, लक्ष्मीपुरी कामगार चाळ, व्हीनस कॉर्नर, आदी परिसरातील शेकडो कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. या कुटुंबांसाठी महापालिकेने निवारा केंद्रे उभा केली असून तेथे वैद्यकीय सेवा, पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे.
कोल्हापूरला जोडणारे राज्यमार्ग बंद
कोल्हापूरमधून रत्नागिरी, राधानगरी, आजरा, गगनबावडा, गारगोटी, आदी राज्यमार्ग महापुरामुळे बंद झाले आहेत. तसेच कोल्हापूर-पुणे, कोल्हापूर-सांगली आणि कोल्हापूर-निपाणी हे मार्ग देखील बंद झाले आहेत.
२०१९ च्या महापुराची आठवण
जोरदार पावसामुळे सन २०१९ मध्ये कोल्हापूरमध्ये महापूर आला होता. त्यापेक्षा जास्त सध्या याठिकाणी पाऊस सुरू आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपूर्वीच्या महापुराची अनेकांना आठवण झाली.