सुरज पाटील
कोल्हापूर हेरले:- गणूचा गोंदा... सोडून धंदा. रिकामां गावात फिरतोय रं.. अनु आईकडे रूपाया मागतोय रं.." बदलत्या समाज व्यवस्थेतील वास्तवतेवर विनोदी रचनेतून प्रकाश टाकणारे महाराष्ट्र शाहीर कुंतीनाथ करके (वय 85) यांचे रात्री २ वाजता ह्रदयविकारने निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील शाहिरी परंपरेतील हिरा हरपला अशी भावना व्यक्त झाली..त्यांनी अनेक मराठी चित्रपटासाठी गीत लेखन केले होते.
हेरले (ता. हातकणंगले) येथील गरीब शेतकरी कुटुंबात १० एप्रिल १९३६ रोजी हेरले येथे करके यांचा जन्म झाला. पदवीपर्यंतचे शिक्षण घेत असताना स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे जनक डॉ.बापूजी साळुंखे यांचा गुरूसहवास लाभला. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होताच ते स्वामीविवेकानंद शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून रूजू झाले. ज्ञानदानाचे कार्य करत असताना संस्थेच्या प्रगतीमध्ये मोलाचे सहकार्य दिले. यातूनच त्यांना लाभलेल्या शाहिरी कलेचीही त्यांनी जोपासना केली, आजवर अनेक विषयांवर, व्यक्तीमत्वावर, इतिहासावर रचलेले आणि गायलेले पोवाडे अजरामर झाले आहेत,उमेदीच्या काळात त्यांनी शाहीरी झंकार, हे शाहीरी काव्य तर 'येडें पेरलं खुळे उगवल" हे विनोदी नाटक प्रसिद्ध झालं होतं. त्यांच्या रचनेला आणि वाणीला वेगळीच धार असल्याने महाराष्ट्रातील श्रोत्यांना आजही मंत्रमुग्ध होण्याची भुरळ पडते. त्यांनी बऱ्याच मराठी चित्रपटांमध्ये गीतरचना केली आहे.
स्वत: शेतकरी कुटुंबात घडलेलं पिंड असल्याने करके सरांनी मातीशी कधी नाळ तोडली नाही,सेवानिवृत्तीनंतर सध्या उतम शेतीवर लक्ष दिले आहे. त्यातृनच जीवनातील अनुभवलेल्या प्रसंगाचं आत्मकथन साकारलं जात आहे. त्यांचे पाझर, चैत्रपालवी, कांचनकुंम, जलधाराइत्यादी काव्यसंग्रह आणि कथा ही महावीरांची हा चरित्र ग्रंथ लिहिला आहे. त्यांची अनेक देवतांच्या गाण्यांची कॅसेटसू प्रसिद्ध झाली आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत गंगू बाजारला जाते,औदा लगीन करायचं, बोला दाजीबा, सख्या सजना, बायको आली बदलून, अन्याय, प्रतिकार, सुळावरची पोळी, सोंगाड्या इत्यादी चित्रपटात गाणी लिहिली.त्यांना शासनाचा दलितमित्र पुरस्कार,व डॉ डी वाय पाटील विद्यापीठ मार्फत डिलीट पदवी बहाल करण्यात आलीआहे.आज.त्यांच्या पश्चात पत्नी ,मुलगा, सून नातवंडे असा परिवार आहे.