कोल्हापूर : व्यापाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी "महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स" च्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीने उद्या मंगळवारी महाराष्ट्र व्यापार बंदचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष तथा कृती समितीचे प्रमुख ललित गांधी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत राज्य सरकार व्यापाऱ्यांच्या मागण्याबाबत सकारात्मक असल्याची ग्वाही दिली. त्यामुळे उद्याच्या बंदबाबत व्यापारी कृती समिती काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. 'सेस' रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीने उद्या मंगळवारी राज्यव्यापी बंद पुकारला आहे. व्यापाऱ्यांच्या बंदमुळे राज्यातील बाजारपेठा, मार्केड यार्ड बंद राहणार आहेत. याचा परिणाम दैनंदिन सेवेवर होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने व्यापारी प्रतिनिधींशी चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. सध्या मुंबईत सह्याद्री अतिथिगृह येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व्यापाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक सुरु आहे. ही बैठक संपल्यानंतर कृती समितीचे पदाधिकारी एकत्रितपणे चर्चा करून उद्याच्या बंद बाबतचे पुढील धोरण जाहीर करतील, असे ललित गांधी यांनी सांगितले.
व्यापाऱ्यांचा उद्या राज्यव्यापी बंद; मुख्यमंत्र्यांचा थेट 'चेंबर' अध्यक्षांना फोन, म्हणाले..
By पोपट केशव पवार | Published: August 26, 2024 11:55 AM