सांगली : कोल्हापूरच्या महाराष्ट्र क्रीडा मंडळाने इस्लामपूरच्या खा. एस. डी. पाटील ट्रस्टचा पराभव करत खुल्या हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. कोल्हापूरने पाटील ट्रस्टचा २-१ गोलने पराभव केला.२०१० मध्ये कोल्हापूरच्या छावा क्बलने विजेतेपद मिळवले होते. जयहिंद व्यायाम मंडळातर्फे विश्रामबाग येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर राष्ट्रीय क्रीडापटू मारूती हरी पाटील चषक खुल्या हॉकी स्पर्धा पार पडल्या. कोल्हापूरचे महाराष्ट्र क्रीडा मंडळ व इस्लामपूरचे खा. एस. डी. पाटील ट्रस्ट यांच्यात अंतिम सामना पार पडला. कोल्हापूरने प्रारंभीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. इस्लामपूर संघ आव्हान उभे करण्यात कमी पडला. २-१ गोलने कोल्हापूरने इस्लामपूर संघाचा धुव्वा उडवत विजय मिळवला. विनोद मनुगडे (मालिकावीर), सूरज जाधव (उत्कृष्ट गोलकिपर), अमर धोत्रे (उत्कृष्ट फुलबॅक), वैभव खांबे (उत्कृष्ट हाफबॅक), ओंकार पाटक्षल (उत्कृष्ट फॉरवर्ड), सुभाष काजवडेकर (हॉकी संघटक) यांना सन्मानित करण्यात आले. खा. संजय पाटील यांच्याहस्ते बक्षीस वितरण झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर होते. संजय देव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष कुमार पाटील, सचिव राजेंद्र पाटील, अशोक लोंढे उपस्थित होते.कोल्हापूरच्या महाराष्ट्र क्रीडा मंडळास खुल्या हॉकी स्पर्धेतील विजेतेपदाचा चषक खासदार संजय पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र क्रीडा मंडळ विजेते
By admin | Published: December 29, 2014 11:08 PM