म्हाकवे - सीमाभागातील सर्वच युवक-युवतींना रोजगार मिळून ते स्वावलंबी झाले पाहिजेत.तसेच येथील प्रत्येक नागरिक ताठ मानेने जगला पाहिजे.यासाठी संघर्षाची भुमी असणारा महाराष्ट्र हा सीमाभागातील मराठी भाषिकांच्याही पाठिशी ठामपणे उभा राहिल.अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. आता प्रत्येक वर्षी शिवजयंती दिनी याच ठिकाणी रोजगार मेळावा घेण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
अर्जुननगर (ता. कागल)येथील देवचंद महाविद्यालयाच्या पटांगणात महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि देवचंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या महा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दिपक दळवी होते. खासदार धैर्यशील माने, देवचंद महाविद्यालयाचे अध्यक्ष आशिष शाह, दिपक दळवी, जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनीही मनोगते व्यक्त केली.यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार, रवींद्र माने, जयराम मिरजकर, लक्ष्मण पाटील यासह सीमाभागातील प्रमुख उपस्थितीत होते. उद्योजकांना अनुदान... युवकांना समाधानकारक पगाराचीही ग्वाही खाजगी कंपनीत युवक युवतींना नोकरी देताना समाधानकारक पगारही देण्याच्या सूचना करत सामंत यांनी महाराष्ट्राप्रमाणेच सीमाभागातील उद्योजकांना अनुदान व इतर सुविधा देण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले.
सीमाभागात लवकरच सीमाप्रश्नी मेळाव्याची घोषणामहाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दळवी यांनी रोजगार मेळाव्याबाबत समाधान व्यक्त करत सीमाप्रश्नाबाबतही मेळावा घेण्याचे आवाहन केले.या संदर्भ घेत सीमाप्रश्नाचे समन्वयक शुभंराजे देसाई, चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थित लवकरच सीमाप्रश्नी मेळावा घेण्याची घोषणाही सामंत यांनी केली.
सामंत यांची अशीही समयसूचकता... व्यासपीठावर एका बाजूला बसलेल्या दळवी यांना आपल्या नजीकच बसविले.तसेच, संयोजकांनी प्रमुख पाहुणे असणार्या सामंत यांच्या सत्काराची सर्वप्रथम घोषणा केली.माञ, तात्काळ त्यांनी जेष्ठ असणार्या दळवी यांचा सत्कार करण्याच्या संयोजकांना सुचना केल्या.सामंत यांच्या या समयसूचकतेबाबत उपस्थितांनी कौतुक केले. तुमच्या घोषणा... आमच्या हृदयात... कारवार,बिदर,भालकीसह बेळगावसह ८६५गावे महाराष्ट्रात दाखल झालीच पाहिजेत... बेळगांव आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे अशा घोषणा देण्यात आल्या.या संदर्भ घेत तुमच्या घोषणा आमच्या हृदयातील आहेत.तुमच्या न्याय हक्कासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचेही सामंत यांनी सांगितले.